March 3rd, 2020

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचे रोहित पवारांनी केले स्वागत; म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (ता.२) ट्विट करत सोशल मीडीयापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली. त्यावरून देशभर चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर मोदींनी मंगळवारी (ता.३) आणखी एक ट्विट करून यासंबंधीचा खुलासा केला.

येत्या रविवारी (ता.8) जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटचे व्यवस्थापन महिला करतील. यावेळी मोदी स्वत: त्यांच्या बाजूला राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या संघर्षातून समाजाला प्रेरणा मिळेल, अशा महिलांवर सोशल मीडिया चालवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे, अशा प्रेरणादायी महिलांची माहिती पोहोचविण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी जनतेला केले आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या कल्पनेमुळे देशातील अनेक भगिनींचं कर्तृत्त्व आपल्यापर्यंत पोहोचेल. अशाचप्रकारे बेरोजगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घेतल्यास त्यांच्याही अडचणी कळतील आणि त्यातून योग्य मार्ग काढता येईल, असे आमदार पवार यांनी म्हटले आहे.

#SheInspiresUs हा हॅशटॅग नेमका आहे तरी काय?

८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विशेष उपक्रम राबविणार आहेत. या दिवशी मोदी आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स समाजात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांना चालविण्यास देणार आहेत.

देशभरातील अशाच प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान महिलांच्या स्टोरीज सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी त्यांनी #SheInspiresUs हा हॅशटॅगही वापरण्याची विनंती केली आहे. जास्तीत जास्त भारतीयांनी आपल्या परिसरातील महिलांचा गौरव करत त्यांच्या लढ्याला सर्वांसमोर आणावे, असे आवाहनही केले आहे.
www.esakal.com/maharashtra/ncp-mla-rohit-pawar-welcomes-pm-narendra-modi-decision-about-social-media-handle-267405