June 2nd, 2020

कोरोना, डरो ना… कर्जतमध्ये रोहित पवारांनी केली ही व्यवस्था

ग्रामीण भागात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आमदार पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती गावात न जाता कर्जत, राशीन, मिरजगाव शहरातच क्वारंटाईन केले जाईल.

कर्जत : मतदारसंघातील जामखेड तालुक्यात कोरोनाचे सतरा रुग्ण आढळले होते. मात्र प्रशासनाचे योग्य नियोजन आणि तेथील ग्रामस्थांनी केलेले सहकार्य यामुळे जामखेड कोरोनामुक्त झाले. आता कर्जत तालुक्यातील काही भागात आढळून आलेल्या रुग्णांमुळे आमदार रोहित पवार यांचा कोरोना रोखण्यासाठी वॉच सुरू आहे.

हेही वाचा – आईला कोरोना झाला नि लेक सासुरवाडीला पळाला

ग्रामीण भागात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आमदार पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती गावात न जाता कर्जत शहरातच क्वारंटाईन केले जाईल. त्यानंतर तो त्याच्या घरी जाईल. कारण मुंबई, पुणे तसेच रेड झोनमधून आलेल्या लोकांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होतो आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

येथे आहेत विलगीकरण कक्ष

आता कर्जत शहरात महात्मा गांधी महाविद्यालय व समर्थ विद्यालय, राशीनचे जगदंबा विद्यालय, मिरजगावचे सद्गुरू कृषी महाविद्यालय आदी ठिकाणी विलगीकरण कक्षाची सोय केली आहे. कर्जत,राशीन व मिरजगाव येथील विलगीकरण कक्षांना मध्यवर्ती विलगीकरण कक्ष असा दर्जा देण्यात आला आहे. कर्जत नगर पंचायतीच्या हद्दीत असलेल्या विलगीकरण कक्षांना देखील महसूल विभागांतर्गत विलगीकरण कक्षात सामावेश केला आहे.

जामखेडमधील सोय

जामखेड तालुक्यातही न्यू इंग्लिश स्कुल खर्डा, नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड या तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष ठेवण्यात येणार आहे. या अगोदर विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असलेल्या लोकांना सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी होत होत्या. आमदार रोहित पवार यांच्या वतीने आता अधिकच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

आमदार पवारांचे जेवण आणि नाष्टा

कर्जत तालुक्यातील विलगीकरण कक्षासाठी १५ तर जामखेडसाठी १५ शौचालये आमदार पवारांनी उपलब्ध केली आहेत. आणि गरज भासल्यास शौचालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. विलगीकरण केलेल्या ग्रामस्थांना नाष्टा व जेवणाची व्यवस्था आमदार पवार यांच्या वतीने केली आहे.

कर्जत-जामखेडच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी!
कर्जत-जामखेडच्या जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही माझी असुन राज्यात पहिल्यांदाच असा उपक्रम मतदारसंघात राबवण्यात येत आहे.प्रशासनाचे काम आणि नागरीकांचे सहकार्य चांगले आहे.आता कोरोना रोखण्यासाठी गावात येणाऱ्या प्रत्येकाची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवा. जरी बाहेरून कोणी येत असेल तर विलगीकरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आ.रोहित पवार यांनी केले आहे.

https://www.esakal.com/ahmednagar/corona-dont-be-afraid-arrangement-was-made-rohit-pawar-karjat-301653