July 26th, 2020

पुणे : लॉकडाउनमध्ये मिळाला ‘एवढ्या’ महिलांना रोजगार; पवार कुटुंबीयांचा पुढाकार

– बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व शारदा महिला संघाचा पुढाकार

वालचंदनगर  (पुणे) : लॉकडाउनच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार हिरावले गेल्याच्या घटना घडल्या. मात्र, बारामतीमधील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्या माध्यमातून बारामती, इंदापूर, पुरंदर व सिद्धटेकमधील बचत गटातील २४० महिलांना मास्क निर्मितीमधून रोजगाराची संधी मिळाली असून, ८५ हजार मास्क निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे.

देशात मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाला. कोरोनामुळे उद्योगधंद्याचे चक्र थांबले. अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार गेले. ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी वाढली. मात्र, बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार, आमदार रोहित पवार, पुण्यातील सतिश मगर व कुंती पवार यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर, बारामती, पुरंदर व सिद्धटेकमधील बचत गटातील सुमारे २४० महिलांना मास्क निर्मितीच्या रोजगाराची संधी मिळाली.

सध्या नांदेड सिटी व मगरपट्टा सिटीमधील नागरिकांसाठी ८५ हजार मास्कची गरज असून, महिलांच्या माध्यमातून मास्क निर्मितीचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत महिन्याभरामध्ये ५० हजार मास्कची निर्मिती झाली आहे. यामुळे महिलांना घरबसल्या रोजगारची संधी मिळाली आहे. २०१५ पासून सुनंदा पवार यांचा महिलांसाठी उद्योग बनविण्याचा प्रयत्न सुरू असून, ग्रामीण भाागतील महिलांना एकत्र घेऊन नवनवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची धडपड सुरू आहे. मास्क निर्मितीमुळे कोरोनाच्या काळात महिलांना रोजगाराची संधी मिळाल्याचे समन्वयक बाळासाहेब नगरे यांनी सांगितले.

महिलांना मिळाला रोजगार…

आमच्या महिला बचत गटाचा बेकरीचा व्यवसाय आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये बेकरीच्या उत्पादनाची  मागणी घटली. महिला बेरोजगार झाल्या. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्यामुळे बचत गटाला मास्क निर्मितीचे  काम मिळाले. सध्या एक-एक महिला दिवसामध्ये ७० ते ८० मास्क बनवत असून, प्रत्येकीला ३०० ते ४०० रुपये घरबसल्या मिळत असल्याचे  बेलवाडी (ता. इंदापूर) येथील मयुरेश्‍वर महिला बचत गटाच्या सचिव सुरेखा शिंदे यांनी सांगितले.

https://www.esakal.com/pune/womens-got-employment-through-mask-making-lockdown-pune-326288