February 27th, 2020

शिक्षक पती-पत्नींना जिल्ह्यातच एकत्र काम करण्याची संधी द्या, रोहित पवार यांची मागणी

वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीला एकत्र काम करता यावे या मागणीचे निवेदन आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक दांपत्य हे गेली 10 ते 15 वर्षांपासुन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अध्यापनाचे काम करत आहेत. कुटुंबापासुन शेकडो कि.मी.अंतरावर काम करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कुटुंबाची हेळसांड झाल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही गोची होते. त्यामुळे घटस्फोटासारख्या घटनाही घडत आहेत. हे टाळण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीला एकत्रित राहता यावे यासाठी त्यांची प्राधान्याने बदली करण्याचा निर्णय सप्टेंबर 2011 मध्ये राज्यसरकारने घेतला होता. परंतु भाजप सरकारने एप्रिल 2017 मध्ये बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीची एका जिल्ह्यात बदली करण्यात अडथळा निर्माण झाला. याचा एकूणच शिक्षकांच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.

दरम्यान, बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती-पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरविण्याची मागणीला लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले, अशी माहिती आमदार पवार यांनी दिली.

मागणीचे कौतुक – विनोद देशमुख
एकमेकांपासुन दूर व वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक दांपत्यांना आपल्या जीवनात खुप अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सर्वच घटकाला दिलासा मिळाला तर हा खूप जिव्हाळ्याचा विषय ठरेल. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मागणीचे निश्चितच कौतुक आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत तालुक्यातील जुनी पेंशन हक्क संघटनचे अध्यक्ष विनोद देशमुख यांनी दिली.

https://www.saamana.com/mla-rohit-pawar-ahmednagar-guardian-minister-hasan-mushrif-husband-wife-teacher/