June 8th, 2020

आमदार रोहित पवारांनी उचललं हे पाऊल, 27 हजार विद्यार्थ्यांसाठी सुरू झालं शिक्षणाचं नवं पर्व

जामखेड 8 जून:  राज्यात खासगी शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलेला असतानाच सरकारी शाळांसाठी काय? हा प्रश्न विचारला जात आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासगी टेक कंपन्यांच्या मदतीने आपल्या मतदार संघात नवा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा 458 शाळांना आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या 27 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पवार यांच्या पुढाकारातून व झोहो कार्पोरेशनच्या माध्यमातून कर्जत-जामखेड या दोन तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या 27 हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

आता येथील विद्यार्थी आता डिजीटल अभ्यासक्रम शिकणार आहेत. खासगी शाळांप्रमाणेच अधुनिक पध्दतीने येथील शिक्षक मोबाईलवर वर्ग चालवतील अन् मुलांच्या हजेरीपासून धडा गिरविण्यापर्यंत व गृहपाठापासून ते अगदी परीक्षेपर्यंत सारे काही शाळेसारखेच घडेल असा हा उपक्रम आहे.

रोहित पवार यांनी मुलांच्या शिक्षणासाठी या नव्या संकल्पनेचा वापर मतदारसंघात केला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी संकल्पना राज्यात राबवण्यासारखी असल्य़ाचे मत व्यक्त करीत पवार या उपक्रमाचं स्वागत केलं.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेडमध्ये सुरू केलेल्या डिजीटल शाळांचे ऑनलाईन उदघाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. यावेळी झालेल्या वेबिनारमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, झोहो कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू, संचालक देव आनंद, नगरचे जिल्हा परीषद अध्यक्ष, उपाघ्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.

कोरोनाच्या काळात प्राथमिक शाळांमधील शिक्षणाची दिशा मार्गस्थ करण्यासाठी अनेक प्रश्न समोर आहेत. त्यातच खासगी शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या मोबाईलवर अभ्यासक्रम पाठवून दररोजच्या ऑनलाईन शिक्षणाला सुरवातही केली आहे. अशा परिस्थितीत या दोन तालुक्यातील ४५८ शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतचे २७ हजार विद्यार्थी शिकू शकतील अशी नवी संकल्पना राबवली जात आहे.

यामध्ये पालकांच्या मोबाईलची शाळेतील संबंधित वर्गाच्या शिक्षकांकडे नोंदणी करून त्या मुलाचा वर्ग सुरू होतील. शिक्षक त्या वर्गाचे म्हणजे ग्रुपचे अॅडमिन असतील आणि हे शिक्षक त्या वर्गातील मुलांना दररोज सकाळी अभ्यासक्रम पाठवतील. त्या अभ्यासक्रमानंतर दिलेला गृहपाठ दुसऱ्या दिवशी तपासतील. ठरलेल्या दिवशी त्याची परीक्षा देखील घेऊ शकतील अशा प्रकारची ही नवी संकल्पना आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, या दोन तालुक्यातील मुले मागे राहणार नाहीत व पायाभूत शिक्षणाबाबत नेहमी अग्रेसर राहतील याच दृष्टीने झोहो वर्गाची निर्मिती झाली आहे. ग्रामीण भागात मोबाईल व नेटवर्कच्या अडचणी असतील, मात्र त्यातूनही मार्ग काढावा लागेल. येत्या काळात त्यावरही पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.`

https://lokmat.news18.com/maharashtra/mla-rohit-pawar-took-the-initiative-for-digital-schools-in-his-constituency-mhak-457708.html