August 10th, 2020

दीड लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी १४० कोटी रूपये वर्ग

आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळालेल्या रकमेचा आकडा 191 कोटी 58 लाखांवर गेला आहे. पहिल्या टप्प्यात ऑक्‍टोबर दरम्यान जिल्ह्याला 49 कोटी 17 लाख रुपये मिळाले.

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून 2018-19 मधील रब्बी पिकांची नुकसान भरपाई मिळालेली नव्हती.

येथील शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना त्यासाठी साकडे घातले होते. पवार यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नातून मतदार संघातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील 1 लाख 48 हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर 140 कोटी रुपये वर्ग करण्यात आले.

दरम्यान, आधार लिंक नसणे किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे 65 हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ घेता आला नाही. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, पवार यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे व मुख्य सांख्यिकी उदय देशमुख यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या.

कृषी आयुक्त दिवसे यांनी संबंधित पीकविमा कंपनी व केंद्र सरकारशी संपर्क साधून वंचित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अटींची पूर्तता करण्याची संधी दिली.

आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळालेल्या रकमेचा आकडा 191 कोटी 58 लाखांवर गेला आहे. पहिल्या टप्प्यात ऑक्‍टोबर दरम्यान जिल्ह्याला 49 कोटी 17 लाख रुपये मिळाले. त्यात जामखेडसाठी 12 कोटी 15 लाख, कर्जतला 5 कोटी 46 लाख, दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्याची रक्कम 89 कोटी 88 लाख झाली. त्यात कर्जतच्या रकमेत 33 कोटींची वाढ झाली, तर जामखेडच्या रकमेत 20 कोटी 34 लाखांची वाढ झाली.

तिसऱ्या टप्प्यात जुलैअखेरीस जिल्ह्याची रक्कम 191.58 कोटी झाली. त्यात कर्जतच्या रकमेत 47 कोटी 56 लाख, तर जामखेडसाठी 32 कोटी 18 लाख एवढी वाढ झाली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, जामखेडचे तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींच्या प्रयत्नातून रखडलेली रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली.

https://www.esakal.com/ahmednagar/140-crore-crop-insurance-15-lakh-farmers-332213