July 8th, 2020

पुण्यातील व्यापारी हबसाठी लागणार काही हजार एकर जागा, रोहित पवार म्हणतात आमच्याकडे या

पुणे : शहरातील होलसेल आणि अन्य मोठ्या व्यापाराचे विकेंद्रीकरण करून ‘हब’ तयार करण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाला पुण्याच्या जवळपास काही हजार एकर जागा हवी आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तशी मागणी केली आहे. ही मागणी पवार यांनी राज्य सरकारपर्यंत पोहोचवून या विषयात मध्यस्थी करावी, अशीही व्यापाऱ्यांची मागणी आहे.

पुणे व्यापारी महासंघाची मंगळवारी पुण्यात बैठक झाली. त्याला पवार उपस्थित होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, विठ्ठलशेठ मणियार आणि अन्य 28 व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. करोनाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. त्यात काही राज्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुणे हे औद्योगिक, शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जसे महत्त्वाचे शहर आहे तसे हे विविध प्रकारच्या व्यवसायाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हा व्यापार शहरात केंद्रीत आहे. तो विकेंद्रीत करण्याचा महासंघाचा विचार आहे, त्यासाठी त्यांना काही हजार एकर जागा हवी असल्याचे पवारांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, व्यापाऱ्यांच्या या मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘कोणत्याही संघटनेला किंवा सरकारला मोठं व्यापारी केंद्र किंवा एक्सिबिशन सेंटर उभारायचं असेल तर कर्जत-जामखेडचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात त्यांचं स्वागत आहे. कोणत्याही संघटनांनी इच्छा दाखवावी… मी ताकद देईल’. अस रोहित पवार म्हणाले आहे.

तर, पुणे शहरातील मंडईचे जसे विकेंद्रीकरण करून मार्केट यार्ड प्रस्थापित केले. तसेच, या व्यापाराचेही करण्याचा विचार आहे. ही जागा रिंगरोडजवळ असावी, तेथे मेट्रोची कनेक्‍टिव्हिटी असावी. शिवाय पाणी, रस्ते, ड्रेनेज यांची सोय असावी अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय, या हबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था त्याच ठिकाणी करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारावा लागणार आहे. त्यासाठीही जागा उपलब्ध करून द्यावी, या बाबींचाही महासंघाने केलेल्या मागणीत समावेश आहे. उत्पादित मालाला प्रदर्शित करण्यासाठी ‘एक्‍झिबिशन सेंटर’ उभारणेही आवश्‍यक आहे. त्यासाठी जागेची मागणी महासंघाने केली असून, तो वेगळा प्रकल्प असेल, असे पवारांनी सांगितले.

‘हब’साठी जी जागा निवडली जाईल ती नागरिकांच्या, ग्राहकांच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे. पुण्याच्या बाजारपेठेत पुण्याबाहेरील ग्राहकही खरेदीसाठी येतात. त्यामुळे सर्वदृष्टीने विचार होणे आवश्‍यक आहे, असे पवार यांनी नमूद केले. महासंघाने कोणतीही जागा पाहणी केली नाही, त्यांना ते शक्‍य होईल असे वाटत नाही. महसूल विभाग त्याची पाहणी करेल. त्यांनी या आधीही पालकमंत्र्यांकडे हा प्रश्‍न मांडला होता. त्यानुसार आज बुधवारी (दि. 8) पीएमआरडीएचे सीईओ विक्रमकुमार यांच्याशी त्यांची बैठक होणार आहे. पीएमआरडीएकडून काही प्रस्ताव येतो का ते पाहू, असे पवार यांनी स्पष्ट केले.

https://maharashtradesha.com/a-few-thousand-acres-of-land-will-be-required-for-a-commercial-hub-in-pune-says-rohit-pawar/