July 26th, 2020

राज्यातील सरळसेवा भरती ही एमपीएससीतर्फेच करावी

राज्यातील सरळसेवा भरती ही खासगी एजन्सीऐवजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फेच (एमपीएससी) करावी, ही मागणी राज्यभरातील तरुणांनी लावून धरली आहे. यासाठी ‘एमपीएससी’नेही तयारी दर्शविल्याने त्यास राज्य सरकारने हिरवा कंदील द्यावा, यासाठी दबाव निर्माण केला जात आहे.

पुणे – राज्यातील सरळसेवा भरती ही खासगी एजन्सीऐवजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फेच (एमपीएससी) करावी, ही मागणी राज्यभरातील तरुणांनी लावून धरली आहे. यासाठी ‘एमपीएससी’नेही तयारी दर्शविल्याने त्यास राज्य सरकारने हिरवा कंदील द्यावा, यासाठी दबाव निर्माण केला जात आहे.

सरळसेवा अंतर्गत राज्य शासनाच्या विविध खात्यांतील वर्ग दोन व तीनची पदे भरली जातात. हे काम पूर्वी महापरीक्षा पोर्टलकडे होते; पण त्यामध्ये डमी उमेदवार बसणे, गुणांमध्ये अफरातफर करून गुणवत्ता वाढविणे अशा भ्रष्ट कामाचे पुरावेही समोर आले. त्यामुळे हे पोर्टल बंद करा, या मागणीने जोर धरला होता. राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्याऐवजी ‘महाआयटी’तर्फे नवीन कंपनीला काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासही तरुणांनी विरोध करत फक्त ‘एमपीएससी’ ही मोहीम ट्‌विटरवर राबवून याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या मागणीस राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार रोहित पवार आदींनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

‘एमपीएससी’चे सहसचिव सुनील औताडे म्हणाले, ‘‘सरळ सेवेतील पदे भरण्यासाठी ‘एमपीएससी’ने तयारी दाखवली आहे. त्यासाठी शासनाला पत्र सादर केले असून, पुढील निर्णय शासन घेईल.’’

शासकीय भरती ही खासगी ठेकेदारांकडून करून घेणे योग्य नाही. ती शासकीय यंत्रणेमार्फतच व्हावी. यासाठी ‘एमपीएससी‘ हा योग्य पर्याय आहे. सरकारी यंत्रणेकडून पदे भरल्यास त्यात पारदर्शकता राहाते व उत्तरदायित्वही निश्‍चित करता येते.

https://www.esakal.com/pune/direct-service-recruitment-state-should-be-done-mpsc-only-326036