August 26th, 2020

आपला झंझावात आम्ही आजही पाहतोय’ ; शरद पवारांबाबत नातवाने व्यक्त केल्या भावना

मुंबई : देशात उद्भवणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. म्हणून तर केंद्रात सरकार कोणाचंही असो प्रत्येक संकटात त्या-त्या सरकारनेही साहेबांची मदत घेतली आहे. मार्गदर्शन घेतले आहे. सेहबांचा झंझावात आम्ही आजही पाहतोय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्यात किल्लारीचा भूकंप असो, गुजरातचा भूकंप असो किंवा मुंबईतील बॉम्बस्फोट असो… अशा प्रत्येक संकटाच्या वेळी शरद पवारांनी योग्य भूमिका घेतली .

शेतकऱ्यांचे प्रश्न असो की उद्योजकांचे.. कामगार, मजूर, महिला, व्यापारी, व्यावसायिक असे सर्वांचेच प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी नेहमी पुढाकार घेतला. किंबहुना या सर्वच घटकांना साहेबांचा नेहमी आधार वाटत आला आहे. म्हणून तर साहेबांच्या भोवती सतत लोकांची गर्दी पाहायला मिळते, असेही रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले .

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट :

आज देशात अनंत अडचणी आहेत. विरोधी पक्षाकडून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात आहेत आणि यापुढंही मांडले जातील. पण ते सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबावही निर्माण करावा लागतो. असा दबाव निर्माण करण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणून एक मोठी ताकद उभी करण्याची आपली क्षमता आहे. विरोधी पक्षातील आश्वासक नेता म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं आहे. म्हणून विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी प्रमुख भूमिका आपण घेऊ शकता आणि आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे. अशा प्रकारे मोट बांधूनच आपण प्रबळ सत्ताधाऱ्यांशी लढू शकतो, असं एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला वाटते . म्हणून देशपातळीवर सामान्य जनतेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणण्याचं सुकाणू आपण हाती घेतलं तर सरकारवर अंकुश राहीलच शिवाय सर्वसामान्यांचे प्रश्नही सुटतील.

राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही समोर सर्वार्थाने प्रबळ असलेल्या विरोधकांशी साहेबांनी एकाकी झुंज देऊन त्यांना सत्तेबाहेर घालवलं. हे साहेबांचं सामर्थ्य आहे आणि विरोधकही ते कबूल करताना दिसतात. आज देशात शक्तिशाली सरकार असूनही ठोस धोरण आखून लोकाभिमुख निर्णय घेतले जात नाहीत. प्रश्न सुटत नसल्याने लोकांचा आक्रोश कायम आहे, असं रोहित पवार म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलं आहे. कधी नव्हे एवढं मोठं आर्थिक संकट आपल्यापुढं उभं ठाकलं आहे. बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. युवांना निराशेने ग्रासलं आहे. कोरोना असतानाही परीक्षा घेऊन मुलांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न होतो. पालकांना टेन्शन आहे. दोन वेळची चूल कशी पेटवायची असा प्रश्न लाखो कुटुंबांना भेडसावतो आहे. या सर्व घटकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोचवणं, त्यासाठी मार्गदर्शन करणं आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता, अभ्यास, चिकाटी, समर्पण वृत्ती, ताकद अन सर्वपक्षीय संबंध असलेले एकमेव नेते म्हणून साहेब आपल्याकडं पाहिलं जातं.

दोन दिवसांपूर्वी महाड इथं इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी #एनडीआरएफ करत असलेलं बचाव कार्य आपण पाहतोय. महापूर, भूकंप, इमारत दुर्घटना किंवा इतर प्रत्येक नैसर्गिक संकटात #एनडीआरएफची भूमिका महत्त्वाची ठरतेय. हे यासाठी सांगतोय की या #एनडीआरएफची स्थापना साहेब आपल्यामुळेच झाली.

आपला झंझावात आम्ही आजही पाहतोय. आज कोरोनाच्या काळातही तुम्ही राज्यभर दौरे करून लोकांना भेटत आहात, त्यांचे प्रश्न समजून घेत आहात आणि ते सोडवण्यासाठी सरकारला मार्गदर्शन करत आहात. वेगवेगळ्या वयोगटातील नेत्यांना, वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेण्याची, त्यांना सांभाळून घेण्याची आपली हातोटी आहे. भल्याभल्यांना अशक्य वाटणारा आघाडी सरकारचा प्रयोग लोकांच्या हितासाठी आपण राज्यात यशस्वी करुन दाखवला. या धक्क्यातून अनेक नेते अजूनही सावरलेले नाहीत. आपला दांडगा अनुभव पाहता लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टी आपण अधिकारवाणीने सरकारकडून करून घेऊ शकता, असा सर्वांना विश्वास आहे , असे रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे .

https://www.maharashtratoday.co.in/feelings-expressed-by-rohit-pawar-about-sharad-pawar/