August 5th, 2020

शरद पवार यांनी लक्ष घातल्यानंतर राज्यातील शिक्षकांसाठी `गूड न्यूज`

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले होते. 

सोमेश्वरनगर ः ऐन कोरोना संसर्गाच्या काळात प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या प्रशासकीय बदल्यांची टांगती तलवार दूर झाली आहे. ग्रामविकास विभागाने आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश बजावले आहेत. तसेच, गैरसोयीच्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांसाठी ‘जिल्हांतर्गत विनंती बदल्या’ समुपदेशन पध्दतीने करण्यासही हिरवा कंदील दाखविला आहे. धास्तावलेला गुरूजींसाठी ही गोड बातमी असूून त्यावर शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोनाचा ऐन संसर्ग भरात आलेला असताना ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याची तयारी केली होती. बदलीपात्र अशा पंधरा टक्के शिक्षकांची माहिती जमा करून १० ऑगस्टला ऑफलाईन बदल्यांची प्रक्रिया पार पडणार होती. ऑफलाईन पद्धतीवर तर टीका झालीच पण कोरोनाच्या काळात बदल्यांची प्रक्रिया कशी करायची असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनांना पडला होता. शिवाय बदल्या झाल्यावर संसार पाठीवर टाकून बदलीच्या ठिकाणी कसे रुजू व्हायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला होता.

यात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले. त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत बैठकही पार पडली. त्यामध्ये केवळ विनंती बदल्या व्हाव्यात अशी संघटनांनी मागणी केली होती. त्यानंतरही बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे शिक्षकांचा जीव टांगणीला लागला होता. शिक्षक संघटनांही प्रयत्नशील राहिल्या. आमदार रोहित पवार यांनी कालपासून स्वतः मुंबई येथे थांबून याप्रश्नी लक्ष घातले. अखेर आज ग्रामविकास विभागास जिल्हांतर्गत प्रशासकीय बदल्या करताना गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो याची उपरती झाली.

सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षकांची संभाव्य गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत असा आदेश आज काढण्यात आला. दरम्यान, सामाजिक अंतर राखून व सरकारी आदेशांचे पालन करत विनंती बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे ज्यांची याआधी गैरसोय झाली आहे, अशा बदलीपात्र शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर बदली मागता येणार आहे. मात्र, हे करताना ‘समानीकरणासाठी (सर्व तालुक्यात रिक्त जागांची समानता) रिक्त ठेवलेल्या जागा शिक्षकांना मागता येणार नाहीत.

खो-खो थांबणार, धोरण बदलणार – रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवार, मुश्रीफ यांचे प्रय़त्न आणि सर्व संघटनांचा पाठपुरावा यामुळे तोडगा निघाला. येत्या काळात शिक्षकांना विश्वासात घेऊन मंत्रीमहोदय सगळ्यांना न्याय देऊल असे योग्य धोरण तयार करेल. पती-पत्नी एकत्रीकरणाचा मुद्दाही मार्गी लावायचा आहे. खो-खो आता थांबेल.“

राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजीराव थोरात, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, यावर्षीच्या बदल्याही मागील सरकारच्या धोरणाप्रमाणेच होणार होत्या. वरीष्ठ शिक्षकाने खो देऊन कनिष्ठाची जागा मागायची अशी पद्धत होती. मात्र, आता प्रशासकीय बदल्या रद्द झाल्याने खो-खो संपला आहे. तर सोयीच्या बदल्या मात्र होणार आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आणि सरकारचे आभारही मानले.

https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/good-news-teachers-govt-stays-administrative-transfers-59620