October 1st, 2020

… असाच विचार मंदिरं, जिम, अभ्यासिकांबाबतही व्हावा; रोहित पवार यांची सरकारला विनंती … असाच विचार मंदिरं, जिम, अभ्यासिकांबाबतही व्हावा; रोहित पवार यांची सरकारला विनंती

५ ऑक्टोबरपासून निर्बंध अधिक शिथिल

टाळेबंदीचे निर्बंध आणखी शिथिल करताना राज्यांतर्गत रेल्वेसेवा, उपाहारगृहे आणि बार, तसेच पुण्यातील उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. धार्मिकस्थळे, शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे, मेट्रो, व्यायामशाळा मात्र अजून काही काळ तरी बंदच राहतील. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी स्वागत केलं. तसंच मंदिरं, जिम आणि अभ्यासिकांबाबतही असा विचार करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली.

“अनेक लोकांचा रोजगार अवलंबून असलेल्या हॉटेल उद्योगाला ५ ऑक्टोबरपासून परवानगी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार. अशाच निर्णयाचा विचार जिम, अभ्यासिका आणि मंदिरांबाबतही व्हावा, ही विनंती. तसंच लोकांनीही मास्क लावून स्वतःची व पर्यायाने इतरांचीही काळजी घ्यावी,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

५ ऑक्टोबरपासून निर्बंध अधिक शिथिल

‘पुन्हा सुरुवात’ या राज्य सरकारच्या मोहिमेंतर्गत ऑक्टोबर महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उपाहारगृहे, बार आणि राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच टाळेबंदी ३१ ऑक्टोबपर्यंत राज्यात लागू राहणार असून, सध्या कायम असलेले निर्बंध यापुढेही लागू राहणार आहेत. शहरी भागातील बाधितांची संख्या कमी होत आहे. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांबरोबरच ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सर्व स्तरातून मागणी होत असतानाही धार्मिकस्थळे आणखी काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईप्रमाणेच पुण्यातही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून त्याबाबत समन्वयाची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. मुंबईतील उपनगरी रेल्वेवर पडणारा ताण लक्षात घेऊन उपनगरी गाडय़ांची संख्या वाढविण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले असून मुंबईतील डबेवाल्यांना ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून या गाडय़ांतून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

येत्या सोमवारपासून (५ ऑक्टोबर) ५० टक्के क्षमतेत उपाहारगृहे, फूड कोर्ट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबत पर्यटन विभाग स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार असून त्याची अंमलबजावणी करीत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व उद्योग, उत्पादन व्यवसाय तसेच व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी धार्मिक स्थळे खुली करण्याची विरोधकांची मागणी मात्र सरकारने मान्य केलेली नाही. मेट्रो रेल्वे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, तरणतलाव, नाट्यगृहे, सभागृहे, आंतराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक सोहळ्यावरील बंदी कायम राहणार आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/government-should-think-about-starting-classes-gym-temples-says-ncp-leader-rohit-pawar-mahavikas-aghadi-unlock-5-jud-87-2290310/