September 5th, 2020

आमदार रोहित पवार म्हणतायेत शरद पवार, राजेंद्र पवार यांच्या विचारातूनच शारदा शिक्षण संकुल

दरवर्षीपेक्षा यावर्षीचा शिक्षक दिन वेगळा आहे. कोरोनाचे संकट असल्याने प्रत्यक्ष शाळा बंद आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागात मात्र, ऑनलाइन शिक्षण फक्त नावालाच आहे. असे असतानाही आपल्या शिक्षकांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत.

अहमदनगर : दरवर्षीपेक्षा यावर्षीचा शिक्षक दिन वेगळा आहे. कोरोनाचे संकट असल्याने प्रत्यक्ष शाळा बंद आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागात मात्र, ऑनलाइन शिक्षण फक्त नावालाच आहे. असे असतानाही आपल्या शिक्षकांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत. अशाच शुभेच्छा राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्या आहेत. याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लेख लिहीला आहे. त्यामध्ये म्हणालेत,

आज शिक्षक दिनानिमित्त आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा…
शिक्षक दिनानिमित्त आपल्यासमोर चार गोष्टी मांडव्यात म्हणून हा लेख लिहीतोय. तसा प्रत्येक दिवस आपणाला काहीतरी शिकवून जात असतो. प्रत्येक दिवशी ती गोष्ट शिकवणारा शिक्षक आपल्या आयुष्यात येत असतो. थोडक्यात रोजचाच दिवस शिक्षक दिन असतो.

गुणवडी-शिर्सुफळ या जिल्हापरिषद गटातून मी माझ्या राजकीय जिवनाची सुरवात केली. सुरवातीपासूनच शिक्षण या गोष्टींवर मी आत्मियतेने काम करत राहिलो आहे. आदरणीय शरद पवार साहेब, स्व. अप्पासाहेब पवार, वडील राजेंद्र (दादा) पवार व आई सुनंदाताई पवार यांच्या विचारातून शारदा शिक्षण संकुल उभा राहिलं. दुसरीकडं लहानपणी शालेय जिवनात असणारे शिक्षक आजही माझ्यासोबत संपर्कात असतात. गुणवडी- शिर्सुफळ गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणासाठी केलेले भरीव योगदान असो की आज कर्जत- जामखेड या विधानसभा मतदारसंघात शैक्षणिक क्षेत्रात होणारी क्रांती असो जर शिक्षक नसते तर आपण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरुच शकलो नसतो, असं मला वाटतं.

आपण अनेकदा पायाभूत विकासाबाबत बोलत असताना लोकांना ऐकतो. पण पायाभूत विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी विद्यार्थांचा शैक्षणिक विकास ही सर्वांत महत्वाची गोष्ट आहे, असं मला वाटतं. हे विद्यार्थी शिकले तर उत्तम डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, वकिल होतील, प्रशासनात जातील आणि काहीजण आपल्यासारखे शिक्षक होऊन येणाऱ्या पिढ्यांना असेच स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी झटत राहतील.

माझा व्यक्तिगत अनुभव सांगायचा झाल्यास डिजीटल शाळा, स्मार्ट शाळा यांच्यासंदर्भात मी जेंव्हा पाऊल टाकण्यास सुरवात केली तेंव्हा मला अनेकांनी असं सांगितलं की शिक्षक या गोष्टींना विरोध करतील. पण जेंव्हा कामास सुरवात केली तेंव्हा सर्वप्रथम याच शिक्षकांनी मला विश्वास दिला. सहा महिन्यांनंतर रिटायर होणारे शिक्षक देखील उत्सुकतेने टॅक्नोलॉजी शिकू लागले. मला वाटतं की कोणत्याही शिक्षकासाठी मुलांनी मी काय नवीन शिकवू हेच स्वप्न असतं आणि सर्व शिक्षक प्रामाणिकपणे हे काम करत असतात. एखाद- दुसऱ्या शिक्षकाची अशी इच्छा नसतेही पण म्हणून सर्व शिक्षकांना दोष देणं पूर्णपणे चुकीचं आहे.

आज कोरोनामुळे अनेक शिक्षक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थांना शिकवत आहेत. अनेकांना या गोष्टी हाताळता येत नसतील किंवा शाळेत शिकवत असतानाचा सहजपणा मोबाईलच्या माध्यमातून शिकवताना येत नसेलं तरिही हे शिक्षक आपल्या मुलांची, सहकार्याची मदत घेऊन मुलांना शिकवत आहे. कारण त्यांना इतकंच वाटतं की एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.

एक शिक्षक प्रामाणिक असतो म्हणूनच आपण आयुष्यभर प्रामाणिक राहू शकतो. मला माझ्या शालेय जीवनापासून आजतागायत मिळालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षकांना मी मनापासून अभिवादन करतोच पण सोबतच आजच्या या संकटात न थकता, न थांबता मुलांसाठी कोणत्याही माध्यमातून शिक्षण पोहचवण्याची उर्जा घेऊन लढणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना देखील मनापासून अभिवादन करतो. तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांतील स्वप्न जागवत आहात हेच खरं!

https://www.esakal.com/ahmednagar/happy-teacher-day-karjat-jamkhed-mla-rohit-pawar-342172