August 2nd, 2020

संकटाच्या काळात लोकसेवेला महत्त्व : आ. रोहित पवार

आयुर्वेद महाविद्यालय येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आ. पवार यांनी दिली भेट
नगर (प्रतिनिधी) –
संकटाच्या काळामध्ये लोकांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आमदार संग्राम जगताप यांनी करोनाच्या संकटकाळात आयुर्वेद महाविद्यालय येथे करोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा रुग्णांना देण्याचे काम केले आहे. आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा आहे. या कॉलेजमध्ये गुरु आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करुन समाजामध्ये एक दिशादर्शक काम ठरेल, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.

आयुर्वेद महाविद्यालय येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आ. रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी आ. संग्राम जगताप, माजी नगरसेवक संजय चोपडा, मर्चंट बॅकेचे संचालक अमित मुथा, कमलेश भंडारी, अर्बनचे संचालक शैलेश मुनोत, धनेश कोठारी, रोशन चोरडिया, राजेंद्र फाळके, अभिजित खोसे, योगेश गलांडे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले की, सकारात्मक दृष्टीकोनातून व सामाजिक बांधिलकीतून काम करणे गरजेचे आहे. आजचा युवक यासाठी पुढे येत आहे. त्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहचत आहे. आयुर्वेद महाविद्यालयात 30 बेडचे गुरू आनंद कोविड सेंटर सुरू आहे. या संकटावर मात करण्यासाठी बडी साजन येथे लवकरच 100 बेडचे कोविड सेंटर सुरु करणार आहे.

https://www.dainikprabhat.com/importance-of-public-service-in-times-of-crisis-b-rohit-pawar/