July 11th, 2020

आमदार रोहित पवारांना आरोग्य सेविकांचे साकडे; “या’ प्रश्‍नात लक्ष घाला

कर्जत तालुक्‍यातील बारा बंधपत्रित आरोग्य सेविकेसह नगर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांचे भवितव्य न्यायालयाच्या आदेशानंतर ही टांगणीला लागले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालण्याची विनंती करून मागणीचे निवेदन दिले आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्‍यातील बारा बंधपत्रित आरोग्य सेविकेसह नगर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांचे भवितव्य न्यायालयाच्या आदेशानंतर ही टांगणीला लागले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालण्याची विनंती करून मागणीचे निवेदन दिले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन आमदार पवार यांनी दिले आहे.
आमदार पवार यांना बंधपत्रित आरोग्य सेविकांनी समक्ष भेटून निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, जिल्हा परिषदेच्या वतीने 1997 ते 2006 या कालावधीसाठी 156 आरोग्य सेविकांची भरती करण्यात आली होती. या सर्व कालावधीमध्ये व त्यानंतर 2020 पर्यंत सर्व आरोग्य सेविकांनी अखंडपणे सेवा बजावली आहे. 24 वर्षांपासून सध्याच्या कोरोनामध्ये सुद्धा शासनाची व जनतेची नियमित सेवा करून नगर जिल्ह्यातील या आरोग्य सेविकाना त्यांची सेवा नियमित करून स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे राज्यातील इतर काही जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना मात्र कायम स्वरूपी स्थायित्व त्या जिल्हा परिषदेने दिले आहे. मात्र नगर जिल्हा याला अपवाद आहे. या संदर्भात सर्व आरोग्य सेविकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने जिल्हा परिषदेला सर्व 156 याचिकाकर्त्याना कायमस्वरूपी स्थायित्व देऊन 1997 पासून कायम करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविकांनी आमदार पवार याची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावून न्याय द्यावा, असे साकडे घातले आहे. यावेळी एस. पी. शेळके, एन. सी. शिंदे, एम. पी. मैड, एम. एस. जाधव, एम. पी. लहाने, ए. एम. भिसे, एम. डी. आरणे, एस. आर. शेख, सी. डी. सुरवसे आदी आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे म्हणाले, जिल्हा परिषदेकडून ग्रामविकास विभागाकडे औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाची प्रत पाठविण्यात आली असून मार्गदर्शन मागविले आहे. त्या निर्देशानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल.

https://www.esakal.com/ahmednagar/karjat-health-workers-demanded-mla-rohit-pawar-319675