September 28th, 2020

आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसादिवशी मागितले गिफ्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा मंगळवारी (ता. २९) वाढदिवस आहे. 

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा मंगळवारी (ता. २९) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बॅनर, बुके, केक यावर खर्च न करता गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सोशल मीडियाच्या फेसबुकवर त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, कोरोनामुळे संपूर्ण जग अडचणीत आहे. सध्या शाळा बंद आहेत. ऑनलाईन शाळा सुरु आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्याकडे असलेले जुने मोबाईल देऊ शकाल. शक्य असल्यास नवीन मोबाईल द्या. येत्या वर्षात मी 100 मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प केला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या काळात अनेक वॉरियर्स मदत करत आहेत. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना गुलाब देऊन सत्कार करा. त्याचे फोटो माझ्या आकाऊंटला टॅग करा हेच मला सर्वात मोठे गिफ्ट असेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊनच कोरोनावर मात होऊ शकते. ग्रामीण भागात बहुसंख्य जणांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप,  डेटा कार्ड देता येईल का किंवा शक्य असल्यास नवीन फोन घेऊन देता येईल का याचा विचार करा. दहावीची परीक्षा झाली आहे. महाविद्यालयाचे शिक्षणही सुरू होईल, काही महाविद्यालयांनी आपली फी कमी केली आहे. काही महाविद्यालये कमी करण्याचा विचार करत आहेत. त्यात अनेक मुलं कॉलेजला जायचे की, नाही याचा विचार करत आहेत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशांपैकी एखाद्याची फी आपल्याला भरता येईल, त्यांच्या होस्टेलचा खर्च करता येईल का याचाही विचार करा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

मी फक्त बोलत नाही, माझ्या परीने मी काम करत असतो. मी स्वतः बारामती येथील शारदा नगर मधील १०० मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प केला आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. अनेकांनी पूर्वी आपले व्यवसाय सुरू केले त्यातून कुटुंब सावरले, व्यवसाय वाढवला पण कोरोनामुळे अनेकजण अडचणीत आले. त्यांना आर्थिक मदत करता आली तर शक्य नाही झाले तर मानसिक आधार देऊन नैराश्यातून बाहेर काढण्याचा विचार करा. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मानसिक आधार द्या. त्यांना मार्गदर्शन करा, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी २९ सप्टेंबरला त्यांच्या पत्नीचाही वाढदिवस आहे. काळजी करु नका फक्त काळजी घ्या भविष्य आपले आहे, असे त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-asked-gift-his-birthday-351830