August 6th, 2020

रोहित पवार का धावले मंत्री आदित्य ठाकरेंच्या मदतीला

रोहित पवार यांनी त्याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येबाबत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत घाणेरडं राजकारण होत असल्याच्या पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मताशी मीही पूर्ण सहमत आहे. पण असं राजकारण करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतेय आणि अशा राजकारणाला लोकांनी कधीही थारा दिलेला नाही.

नगर : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मदतीला आमदार रोहित पवार धावून आले आहेत. अभिनेता सुशांत सिंग प्रकरणावरून आदित्य यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत ठाकरे यांनी घाणेरड्या राजकारण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. रोहित पवार यांनी त्याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येबाबत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत घाणेरडं राजकारण होत असल्याच्या पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मताशी मीही पूर्ण सहमत आहे. पण असं राजकारण करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतेय आणि अशा राजकारणाला लोकांनी कधीही थारा दिलेला नाही.

सुशांत आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण सुशांतच्या मृत्यूवर आपल्या स्वार्थी राजकारणाची पोळी भाजण्याचा हिणकस प्रकार राज्यात आणि राज्याबाहेरील काही लोकांकडून सुरू आहे तो थांबला पाहिजे. स्वतंत्र तपास यंत्रणा असलेल्या पोलिसांवर आरोप करून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रकार होतोय. यामुळं पोलिसांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पण विरोधकांचे हे कुटील डाव आपण उधळून लावून पोलिसांना निःपक्षपणे तपास करुन दिला पाहिजे.

अशा प्रसंगी स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून पोलिसांच्या मागे उभं राहण्याऐवजी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करणं चुकीचं आहे. आरोप करणाऱ्यांनी थोडासा संयम दाखवून धीर धरावा. उतावीळ होऊन एखाद्याच्या मृत्यचं राजकारण करणं हे ज्याचा मृत्यू झाला त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवरही अन्याय करणारं आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ करतील आणि जे दोषी असेल त्यांना शिक्षाही होईल.

कारण महाराष्ट्र पोलिसांची क्षमता आणि गुणवत्ता सगळ्या जगाला माहीत आहे. त्यामुळं उगीच आरोपांची राळ उडवून मुख्य मुद्द्याला बगल देण्याचा खेळ थांबवावा. याबाबत काही पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावेत, पण तसं न करता केवळ प्रसार माध्यमात चमकोगिरी करण्यासाठीच कुणी आटापिटा करत असेल तर त्यांचं राजकारण त्यांनाच लखलाभ.

संपादन – सुस्मिता वडतिले 

https://www.esakal.com/maharashtra/mla-rohit-pawar-came-aid-environment-minister-aditya-thackeray-330488