September 10th, 2020

आमदार रोहित पवारांनी वडिलांसाठी केली ही फेसबुक पोस्ट

काही माणसं पडद्यामागे असले तरी त्यांचं काम हीच त्यांची ओळख बनते. अशा माणसांना ना प्रसिद्धीचं कौतुक असतं, ना श्रेयाची गरज. निःस्वार्थीपने फक्त काम करत राहणं हेच त्यांना माहीत असतं. माझे वडील आदरणीय राजेंद्र (दादा) पवार हेही याच गटातले. मुलगा म्हणून मला बाबांचा मनापासून अभिमान वाटतो, अशी पोस्ट फेसबुकवर आमदार रोहित पवारांनी करुन वडील राजेंद्र पवारांच्या सुरू असलेल्या कार्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला.

जामखेड (नगर) : काही माणसं पडद्यामागे असले तरी त्यांचं काम हीच त्यांची ओळख बनते. अशा माणसांना ना प्रसिद्धीचं कौतुक असतं, ना श्रेयाची गरज. निःस्वार्थीपने फक्त काम करत राहणं हेच त्यांना माहीत असतं. माझे वडील आदरणीय राजेंद्र (दादा) पवार हेही याच गटातले. शेती व मातीशी घट्ट जुळलेली नाळ आणि शेतकऱ्यांच्या विकासाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आजही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला मार्गदर्शन करताना त्यांना आनंदच होतो. त्यांना कुणाचं बोलावणं लागत नाही की मानसन्मान लागत नाही. माझ्या शेतकऱ्यांचं भलं होण्यासाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते सर्व करण्यातच त्यांना आनंद वाटतो. म्हणूनच मुलगा म्हणून मला बाबांचा मनापासून अभिमान वाटतो, अशी पोस्ट फेसबुकवर आमदार रोहित पवारांनी करुन वडील राजेंद्र पवारांच्या सुरू असलेल्या कार्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला.

बारामती कृषी विज्ञान केंद्र व अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी कृषी व कृषी पूरक व्यवसायाशी संबंधित अनेक प्रयोग केले. प्रयोगशाळेतील संशोधन हे चार भिंतीच्या आत न राहता ते थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहचलं पाहिजे, यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. गेल्या काही दिवसांपासून राहुरी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शास्त्रज्ञांचा चमू आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व राज्याच्या कृषी विभागाचे अधिकारी यांना घेऊन कर्जत जामखेड तालुक्यात गावोगावी त्यांची शिवार फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांच्या शेतात, गावात जाऊन ते छोट्या छोट्या बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतायेत. त्यांच्या अडचणी जाणून घेतायेत.

पीक नियोजन, माती परीक्षण, सुधारीत वाणांचं महत्त्व, जैविक खतांची मात्रा, किटकनाशकांचा वापर, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या गोष्टींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायेत. दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक दूध देणाऱ्या गाई कोणत्या आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करावं, याबाबतही ते मार्गदर्शन करतात. शेतीमधील खर्च कमी करून उत्पादनवाढ कशी करता येईल, सुधारीत लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक किड व रोग नियंत्रण, पिकनिहाय शेतकरी गटांची स्थापना व व्हॉट्सअप संदेशाद्वारे माहितीची देवाणघेवाण याबाबतची सखोल माहिती या शिवार फेरीतून शेतकऱ्यांना देण्यात येते.

सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे केले. शेततळ्याची ही वाढती संख्या पाहून त्यात मत्स्य उत्पादन कसं घेता येईल, यासाठीही मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी व तज्ज्ञांशी त्यांची चर्चा होत असते. फक्त शेती करण्याचे दिवस आता गेले. शेतीला जोडधंद्याची जोड असेल तरच ती शाश्वत व फायद्याची ठरते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने साक्षर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

शेतीचा विकास व्हावा, उत्पादन वाढावं, शेतकऱ्यांची आर्थिक पातळी उंचावी आणि अहोरात्र प्रामाणिकपणे घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यालाही सुखाचे चार दिवस यावेत, अशी त्यांची तळमळ असते. शेतकऱ्याने किती दिवस झोपड्यात रहावे? त्यांच्या मुलांनाही चांगल्या शाळेत शिक्षण का मिळू नये? त्यांची मुलं मोठे अधिकारी, व्यावसायिक किंवा उद्योजक का होऊ नये, असा त्यांचा नेहमी रोकडा सवाल असतो.

https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-has-posted-facebook-he-proud-his-fathers-work-344343