October 13th, 2020

शेतकरी बांधवांनो लोकप्रतिनीधी म्हणुन मी आपल्या पाठीशी; आमदार रोहित पवारांकडुन नुकसानीची पाहणी

कर्जत तालुक्यातील अनेक भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील अनेक भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील नुकसानीची पाहणी केली. रात्रभर वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा, कांदा, मका, ऊस, तूर, कापुस, उडीद, नव्याने पेरणी झालेली ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पवार यांनी तहसिलदार, कृषी अधिकारी यांना दिले आहेत. त्यांनी तालुक्यातील आंबिजळगाव, कुळधरण, दुरगाव आदी ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पिकांची पाहणी केली. शनिवारी रात्रभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळ सर्वत्र पाण्याचे डोह साचले अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.अनेक शेतीपिके पाण्यात बुडून गेली तर पावसाबरोबर वादळही असल्याने ऊस, मका, जमीनदोस्त झाले.

परतीच्या पावसाने एकाच रात्रीत घातलेल्या थैमानाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.त्यांना या मुळे दिलासा मिळाला आहे. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडलाधिकारी संजय घालमे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष नितीन धांडे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकसानीचे तात्काळ पंचनामे होतील 
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र शेतकरी बांधवांनो लोकप्रतिनिधी म्हणुन मी आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे.झालेल्या नुकसानीची महसुल व कृषी विभाग पाहणी करून तात्काळ पंचनामे करतील.

https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-inspects-damage-crop-358281