September 30th, 2020

आमदार रोहित पवार ट्रेंडिंगमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर

कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस राज्यभर सामाजिक उपक्रमांचा जागर करणारा ठरला.

कर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस राज्यभर सामाजिक उपक्रमांचा जागर करणारा ठरला. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त त्यांनी बेरोजगारीवर उठवलेला आवाज ट्विटरवर देशात दोन क्रमांकाचा ट्रेण्ड झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

आमदार रोहित पवार यांची तरुणांमध्ये लोकप्रियता आहे. त्यांनी मतदारसंघात व राज्यात केलेल्या कामाची नेहमीच चर्चा होत असते. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राज्यात आठ दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये रक्तदान, मुलांना शालेय साहित्याचे, गणवेशाचे वाटप, सॅनिटायझर वाटप, रुग्णांना मदत, आरोग्य शिबिरे आदी अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले.

सोशल मीडियावर ही ते प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. “रोहित पवार यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करायचा का?”, अशी विचारणा एका यूजरने ट्विटरवर केली होती. पण यावर चिडून न जाता उलट रोहित पवार यांनी त्याला असा काही प्रतिसाद दिला, त्यावरूनच रोहित पवार वाढदिवसाच्या दिवशी ट्विटरवर देशात दोन नंबर ट्रेंड झाले.
‘बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या असून याबाबत मी केंद्र सरकारचे अनेकदा लक्ष वेधले. तसंच माझा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करा, असे आवाहन मीही केल्याने बेरोजगारी या सामाजिक प्रश्नावर तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला तर मला आनंदच होईल,’ अशा संयत आणि सकारात्मक शब्दांत त्यांनी संबंधित यूजरला उत्तर दिले.

परिणामी रोहित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांनी त्यांना शुभेच्छा देताना ट्विटरवर #रोहितपवारwithबेरोजगार हा हॅशटॅग चालवला आणि विशेष म्हणजे ट्रेंडिंगमध्ये हा हॅशटॅग देशात दोन नंबरवर गेला. राज्यातील एका युवा आमदाराच्या वाढदिवसाची देशपातळीवर झालेली चर्चा राजकिय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावणारी आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-ranks-second-country-trending-352601