August 5th, 2020

आमदार रोहित पवार यांनी दाखविली शेतीपूरक धंद्याची ही नवीन वाट

या अभियानाकरिता आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून बारामती अॅग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने विविध संस्थांना बरोबर घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून नवीन शेतीपूरक धंद्याची वाट सापडली आहे. मत्स्यशेतीच्या कार्यशाळा घेवून आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

शेतीत अनेक आव्हाणे आहेत. ती पार पाडूनच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून आपल्या प्रपंचाचा गाडा हकावा लागतो. मात्र शेतीला शाश्वत बनविण्यासाठी शेतकरी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी शेती पुरक जोडधंदे किफायतशीर ठरतात, हे मात्र निश्चित आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन या व इतर व्यावसायाबरोबरच मत्यस्यशेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते, हे ओळखून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवारांनी बारामती अॅग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या पदाधिकारी-अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदिस्त शेततलावातील मत्सपालन, बायोफ्लॉक पध्दतीने मासे उत्पादन व पिंजरा पध्दतीने, मत्स्य उत्पादन या विषयक सविस्तर मार्गदर्शन या अभियानातुन होत आहे. तरुण शेतकरी, महिला शेतकरी यांनी मत्स्य शेतीचा अवलंब करून अधिकचे उत्पादन या व्यवसायातुन मिळावे, यासाठी आमदार रोहित पवारांचा आग्रह होता. त्यांच्याच संकल्पनेतून अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी पुढाकार घेऊन मत्स्यपालनाच्या कार्यशाळा सुरु केल्या आहेत. निरनिराळ्या गटातील शेतकऱ्यांना चार दिवस निरनिराळ्या गावात हे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

यानिमित्ताने मत्स्य शेती कशी किफायतशीर ठरते, मत्स्यशेतीच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्त्रोत कसा उभा करता येतो? ही शेती कशी करायची, यासाठी कोणत्या जातीचे माशे कधी शेततळ्यात सोडायचे, त्यांना खाद्य पुरवठा कसा करायचा? विक्री कशी करायची, या व इतर अनुशंगिक विषयावर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अशा पध्दतीने पहिल्यांदाच मत्स्यशेती या विषयावर कार्यशाळा होत आहे.

या कार्यशाळेची सुरुवात जामखेड तालुक्यातून झाली. पहिल्या दिवशी तेलंगशी, जामखेड, बोराटेवस्ती येथे कार्यशाळा झाली. बुधवारी (ता. 5) हळगाव पिंपरखेड, आरणगाव येथे, तर उर्वरित दोन्ही दिवस कर्जत तालुक्यातील गावांमध्ये ही तज्ज्ञ मंडळी जावून शेतकऱ्यांना मत्यशेतीचे मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही कार्यशाळा दोन्ही तालुक्यात विविध गावांमध्ये चार दिवस चालणार आहे.

या अभियानाकरिता आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून बारामती अॅग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने विविध संस्थांना बरोबर घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, कर्जत – जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन व अ‍ॅक्वा वन सेंटर, मत्स्य व्यवसाय विभाग अहमदनगर, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा नगर या संस्थांचा सहभाग आहे. या वेळी जामखेड तालुका कृषि अधिकारी सुधिर शिंदे, कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे  विषतज्ञ मृदाशास्त्र विवेक भोईटे, संचालक अक्वा वन सेंटर नकुल सदाफुले, मत्स्य शेती तज्ज्ञ चंद्रकांत दाते, आत्मा तज्ज्ञ तुषार गोलेकर, प्रकल्प समन्वयक ओंकार ढोबळे उपस्थित राहत आहेत.

उद्या (गुरुवारी) आमदार रोहित पवार मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने मिरजगाव येथील कार्यशाळेला भेट देऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर कार्यशाळेच्या पहिल्या टप्प्यात चौथ्या दिवशी बारामती अॅग्रीकल्चर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार उपस्थितीत राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे प्रकल्प समन्वयक ओंकार ढोबळे यांनी सांगितले.

Edited By – Murlidhar Karale

https://www.sarkarnama.in/rajya-nagar/mla-rohit-pawar-showed-new-way-farming-59574