October 30th, 2020

Rohit Pawar: अमेरिकेतही पावसाळी सभा! रोहित पवारांनी केलं जोरदार ट्वीट

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार बायडन यांच्या पावसाळी सभेची तुलना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेशी केली जात आहे. (Rohit Pawar on Joe Biden Rally in Rain)

मुंबई: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना महाराष्ट्रात अचानक या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी निमित्त ठरलं आहे तेथील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्या पावसाळी सभेचं. बायडन यांच्या पावसाळी सभेमुळं साताऱ्यातील सभेच्या स्मृती ताज्या झाल्या असून राजकीय टीकाटिप्पणीला सुरुवात झाली आहे. या सभेचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमेरिकेतही सत्तांतराचा अंदाज वर्तवला आहे. (Rohit Pawar on Joe Biden Rally in Rain)

अमेरिकेतील प्रत्यक्ष मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत. बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. फ्लोरिडा येथे एका सभेत बायडन भाषण करत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. मात्र, बायडन यांनी भाषण थांबवले नाही. नेमका असाच प्रकार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साताऱ्यात घडला होता. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. त्यांचं भाषण सुरू असतानाच पाऊस आला. मात्र, पवारांनी भाषण सुरूच ठेवले. या सभेनं त्यानंतर निवडणुकीचा माहौलच बदलून टाकला. निकालानंतर नाट्यमय घडामोडी घडून राज्यात सत्तांतर झाले. तोच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज एक ट्वीट केलं आहे.

‘जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो, पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे,’ असं रोहित यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेप्रमाणेच बायडन यांच्या पावसाळी सभेची अमेरिकेत सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियात या सभेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. त्यामुळं रोहित पवारांचा अंदाज कितपत खरा ठरतो, हे लवकरच समजू शकणार आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/ncp-mla-rohit-pawar-tweet-on-joe-biden-rally-predicts-change-in-government/articleshow/78951616.cms