August 5th, 2020

राम सगळयांचा असण्यातच ‘राम’ आहे, आमदार रोहित पवारांचं ट्विट

नगर : पोलीसनामा ऑनलाइन –   अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यामुळं अवघा देश आज राममय झाला आहे. सोशल मीडियावरून देशातील रामभक्त आपल्या भावना व्यक्त करत आहे. काहीजण जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. आजच्या या मंगलमय दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रामानामाचा महिमा सांगणारं जबरदस्त ट्विट केलं आहे. रोहित पवार यांचे हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, रामप्रहरापासून आपला दिवस सुरु होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खूण असते. साने गुरुजी म्हणायचे, रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत.

दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधीजींचा राम, वारकऱ्यांना समाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात, निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत अंसं होऊ नये, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

https://policenama.com/ncp-mla-rohit-pawar-tweets-on-the-occasion-of-ram-mandir-bhumi-poojan/