October 22nd, 2020

रोहित पवारांनी ‘असे’ केले एकनाथ खडसेंचे स्वागत

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी खास ट्वीट करत त्यांचे स्वागत केले आहे. (Rohit Pawar welcomes Eknath Khadse)

अहमदनगर:एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अत्यंत मार्मिक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीच्या टीकाकारांना निसर्गाचा नियम सांगत टोला हाणला आहे. (Rohit Pawar welcomes Eknath Khadse)

‘राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते,’ असं सूचक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. ‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ असं म्हणत त्यांनी खडसेंचं पक्षात जोरदार स्वागत केलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा संदर्भ रोहित पवारांच्या या ट्वीटला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार व नेते पक्षाला सोडून गेले. राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता राज्यात पुन्हा येणार नाही असा या साऱ्यांचा कयास होता. राष्ट्रवादी काँग्रेस संपली अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खुद्द प्रचारसभांमधून समोर पैलवान नसल्याचं सांगत होते. शरद पवारांचं राजकारण संपलं आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याला त्यावेळी या पक्षांतराबाबत प्रश्न विचारले जात होते. मात्र, शरद पवारांच्या झंझावातामुळं राष्ट्रवादी व काँग्रेसनं राज्यात सन्मानजनक जागा मिळवल्या आणि भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले. त्याचा फायदा घेत शिवसेनेनं सत्तावाटपावरून भाजपला कोंडीत पकडले. अखेर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा येऊन राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. शरद पवार यांनी त्यासाठी स्वत: पुढाकार घेतला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच राष्ट्रवादीनं पुन्हा बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. भाजपचे अनेक लोक राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे. खडसे यांचा प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या ट्वीटकडं पाहिलं जात आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/ncp-mla-rohit-pawar-welcome-eknath-khadse/articleshow/78786509.cms