July 8th, 2020

संतप्त रोहित पवारांचा CBSE बोर्डाला इशारा; ‘ती’ अक्षम्य चूक सुधारा

अहमदनगर :

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय बोर्डाने घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पण यात काही महत्वाची प्रकरणे वगळली गेली आहेत, असा आरोप कर्जत जामखेडचे आमदार व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे CBSE ने इयत्ता ९ वी च्या अभ्यासक्रमातून वगळले आहेत. हा प्रकार संतापजनक आहे.

पुढे संतप्त रोहित पवारांनी ‘ही अक्षम्य चूक सुधारुन CBSE ने हे धडे पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत,अशी आग्रही मागणी केली आहे. कोविड – १९ विषाणू्च्या संक्रमणामुळे विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान होत असल्याने सीबीएससी बोर्डाने यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम २१ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याता निर्णय घेतला होता. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी यासंबंधीची माहिती ट्विटरवरून दिली होती. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने (CBSE) यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के पर्यंत कपात केली आहे. अर्थात ही कपात करताना अभ्यासाच्या गाभ्याला धक्का लावला जाणार नाही, असेही सांगण्यात आले होते.

http://www.krushirang.com/maharashtra/2020/07/08/14815/