July 17th, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील रथ यात्रा अतिशय साध्या पद्धतीने

धाकटी पंढरी असलेल्या कर्जतमध्ये आज दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या संत सद्गुरु गोदड महाराज रथ यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने आणि परंपरा कायम राखत साजरा करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन कोरोनाच्या संकटातून सर्वांची सुटका करा, असे संत गोदड महाराजांना साकडे घातले.

कर्जत (अहमदनगर) : धाकटी पंढरी असलेल्या कर्जतमध्ये आज दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या संत सद्गुरु गोदड महाराज रथ यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने आणि परंपरा कायम राखत साजरा करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन कोरोनाच्या संकटातून सर्वांची सुटका करा, असे संत गोदड महाराजांना साकडे घातले.
येथील ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांची दरवर्षी कामिका एकादशी या दिवशी रथ यात्रा भरते. यावेळी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर ही रथयात्रा प्रशासनाने रद्द केली. परंतु परंपरा कायम राहावी, यासाठी आज सकाळी मंदिराचे पुजारी व मानकरी यांनी समाधीस अभिषेक केला. यानंतर मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी व मोजक्या ग्रामस्थांनी भजन केले. दुपारी एक वाजता पांडुरंग, गरुड व हनुमंताची मूर्ती पुजाऱ्यांनी मंदिराच्या बाहेर काढल्या. यावेळी पुंडलिका वरदे हारी विठ्ठल, गोदड महाराज की जय असा गजर करण्यात आला. यानंतर भव्य अशा लाकडी रथामध्ये ठेवून तो रथ जागेवरून थोडा हलविण्यात आला यानंतर तिन्ही देवांच्या मूर्ती परत मंदिरामध्ये नेण्यात आल्या. यानंतर आरती होऊन रथयात्रा संपन्न झाली. यावेळी मानकरी, काही ग्रामस्थ व पुजारी उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सामाजिक अंतर ठेवून मोजक्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये अतिशय साध्या पद्धतीने ही रथ यात्रा संपन्न झाली. दरवर्षी या सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी होते.मात्र दीडशे वर्षात प्रथमच घरातूनच भाविक संत सद्गुरू गोदड महाराजांच्या प्रतिमे पुढे नतमस्तक झाले.

https://www.esakal.com/ahmednagar/rath-yatra-karjat-corona-background-very-simple-manner-322357