July 24th, 2020

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हस्य

तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने मार्गी लागले आहेत. मात्र आता उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने मार्गी लागले आहेत. मात्र आता उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
तालुक्यातील रुईगव्हाण, कुळधरण, राक्षसवाडी, बारडगाव दगड, पिंपळवाड, करमनवाड, करपडी, परीटवाडी, चिलवडी, राशीन, सोनाळवाडी, कोळवडी, अळसुंदे, धांडेवाडी, आंबीजळगाव, म्हाळंगी, लोणी मसदपुर, कोरेगाव, दिघी, निमगाव-डाकु या गावांचा दोन दिवसीय दौरा करत बैठकी घेतल्या.

यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध अडचणी जाणुन घेत तात्काळ त्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या प्रशासनाला सुचना दिल्या.यामध्ये कुकडीचा पाणी प्रश्न, भु-संपादन, चाऱ्यांची दुरुस्ती, रासायनिक खते, विज, रस्ते आदींसह शेतीच्या विविध प्रश्नासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा केली.

तालुक्यातील कुकडीच्या सुमारे २०० किलोमीटरच्या चाऱ्यांची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावीत असुन बेनवडी, थेरवडी, आंबीजळगाव, चिलवडी, कर्जत शाखा कालवा, मुख्य शाखा कालवा आदी चाऱ्या दुरुस्तीचे काम यंत्राच्या सहाय्याने सुरू देखील झाले आहे. तीन महिन्यात चाऱ्या दुरुस्तीचे काम मार्गी लागणार आहे.

पाणी वितरणासाठी कोळवडी विभागांतर्गत येणाऱ्या ९४ नवीन गेटचे तर श्रीगोंदे विभागांतर्गत येणाऱ्या १०४ गेटचे काम प्रस्तावित असुन पुढील महिन्यात ते प्रत्येक ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.

‘तालुक्यातील भु- संपादनाचा विषय मार्गी लावत असताना १० वर्षांच्या कालावधीत सहा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. सरकारकडे पाठपुरावा करून आठ महिन्यात ३६ कोटी आणले.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करून भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी दौऱ्यात सांगितले. कुकडीच्या पाणी वाटपात कुणावर अन्याय होऊ नये तसेच कोणी चाऱ्या फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कायदेशीर कारवाई होईल. त्यात कसलाही हस्तक्षेप राहणार नाही असेही त्यांनी सुनावले.

कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप, तालुका कृषि अधिकारी दीपक सुपेकर, दुरुस्ती विभागाचे अविनाश आव्हाड, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विवेक भोईटे उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले
कुकडीचे स्वप्न साकार होत असताना कित्येक चाऱ्या व पोटचाऱ्या दुरुस्ती अभावी शेतात पाणी येण्याचा अपेक्षाभंग झाला होता. मात्र लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणी मिळेल, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिल्यानंतर वंचित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
संपादन : अशोक मुरुमकर

https://www.esakal.com/ahmednagar/repair-kukdi-canal-mla-rohit-pawar-karjat-taluka-325303