September 2nd, 2020

अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही; कार्यकर्त्यांना रोहित पवारांचं आवाहन

ट्विट करून व्यक्त केल्या भावना

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा लोकांमधील वावर सगळ्यांनाच परिचित आहे. राष्ट्रवादीतील युवा नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे सामान्य राहणी आणि सतत कार्यरत राहणाऱ्या रोहित पवार यांचे महाराष्ट्रभर अनेक चाहतेही आहेत. पण चाहत्यांचं प्रेम कधी उचमळून येईल सांगता येत नाही, रोहित पवारांच्या चाहत्यांनी असंच काहीसं केलं आणि रोहित पवारांना आवाहन करावं लागलं.

झालं असं की रोहित पवार यांच्या नावानं काही तरुण राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाची संघटना सुरू केली. ही बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेल्या रोहित पवार यांना कळली. एका पक्षाचा आमदार असताना कार्यकर्त्यांनी दुसरीच अराजकीय संघटना सुरू केल्याचं ऐकल्यानंतर त्यांनी ट्विट करून असं न करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

“माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहिल,” असं आवाहन रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.

आमदार होण्या आधीपासूनच रोहित पवार यांची लोकप्रियता होती. आमदार झाल्यानंतर त्यांनी कामात गुंतवून घेतल्याचं दिसत. करोनाचं संकट ओढवलेलं असताना ते राज्यभर फिरताना दिसले. वेगवेगळ्या घटकांसाठी मदत करण्याचं कामही त्यांनी केलं. त्याचबरोबर तरुणांच्या मागण्या आणि प्रश्नही ते शासन दरबारी सातत्यानं मांडत असतात.

काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी निधी उभा केला. ज्या डबेवाल्यांची परिस्थिती बिकट आहे, अशांना त्यातून मदत केली जाणार असून त्यासाठी लोकांनीही मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.

https://www.loksatta.com/maharashtra-news/rohit-pawar-appeal-to-his-supporters-bmh-90-2264605/