October 13th, 2020

रोहित पवारांकडून अमित ठाकरेंच्या दिलदारपणाचं कौतुक, चंद्रकांत पाटलांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेची कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले होते.

मुंबई: आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Rohit Pawar applaud MNS Amit Thackeray )

त्याचवेळी रोहित पवार यांनी या टविटच्या माध्यमातून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. केवळ प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी रोहित पवार हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत असल्याचे वक्तव्य मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर रोहित पवार यांनी, ‘आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टीका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत’, अशी खोचक टिप्पणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेची कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. कारशेड कांजूरला हलवल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात प्रचंड मोठी वाढ होईल. तसेच प्रकल्प पूर्ण होण्यास विलंबही लागेल, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी मुंबईच्या पर्यावरणाचे संतूलन अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले होते. तरीही भाजपकडून प्रकल्पाचा खर्च आणि व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.

या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. मुंबईच्या आणि भावी पिढीसाठी गरजेच्या असलेल्या पर्यावरणाचे नुकसान होण्यापेक्षा कारशेडचे नुकसान झालेले परवडेल, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

https://www.tv9marathi.com/politics/rohit-pawar-applaud-mns-amit-thackeray-stand-over-mumbai-metro-car-shed-285072.html