August 28th, 2020

sushant singh rajput case: मुंबई पोलिसांबद्दल चांगलं बोललेलं फडणवीसांना पटलेलं दिसत नाहीः रोहित पवार

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आजा राजकीय रंग चढू लागला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं या प्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

म.टा.प्रतिनिधी, नगर: ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आपल्या महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांच्या बद्दल ज्या चांगल्या गोष्टी बोलल्या, त्या देवेंद्र फडणवीस यांना पटलेल्या दिसत नाहीत. सुप्रीम कोर्टावर त्यांनी आक्षेप घेतला आहे, असे मला वाटते,’ असे परखड मत आमदार रोहित पवार यांनी मांडले. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी पवार आले होते. या बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेल्यानंतर नवनवीन खुलासे समोर येत आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी आज वक्तव्य केले आहे. मुंबई पोलिसांवर काय दबाव होता किंवा अडचण होती, अथवा राजकीय दबाव होता की त्यांनी त्यांची तपासणी केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे फडणवीस म्हणाले होते. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘कदाचित देवेंद्र फडणवीस यांना असे सांगायचे असेल की सुप्रीम कोर्टाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांचे, मुंबई पोलीस यांच्या बद्दल ज्या चांगल्या गोष्टी बोलल्या, त्या त्यांना पटलेल्या दिसत नाहीये. सुप्रीम कोर्टवर त्यांनी आक्षेप घेतला, असे मला वाटते. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की, ‘मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनी जे काही योग्य करायला पाहिजे होते, ते केले आहे. फक्त महाराष्ट्रात काही लोकांनी त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला म्हणून ही केस सीबीआयकडे देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे.’ असं ते म्हणाले.

भाजप कुठल्याही विषयात राजकारण करू शकतो; रोहित पवार

दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्स माफियांचा संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘देशामध्ये अशी एखादी गोष्ट विकत असेल की त्यांनी भावी पिढीचे नुकसान होईल , त्यामध्ये जे कोणी सापडतील त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.’

सुशांतसिंह प्रकरणी भाजपनं आदित्य ठाकरेंचं नाव घेतलंच नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण

सोशल डिस्टंसिंग पाळता आले तर ते चांगलेच

‘कोणतेही मीटिंग घेत असताना, लोकांची सोबत चर्चा करत असताना , सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजे. पण कधीकधी लोक ऐकतात, कधीकधी ऐकत नाही. आता हे प्रेमापोटी असेल किंवा त्यांची काही कामे असतील, त्यामुळे गर्दी होऊ शकते. मला एवढेच सांगायचे की लोकांच्या हिताची कामे करायचे असतील तर सोशल डिस्टंसिंग पाळता आले तर ते चांगलेच आहे,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/rohit-pawar-attacks-on-devendra-fadnavis-over-sushant-singh-rajput-case/articleshow/77805190.cms