August 27th, 2020

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी रोहित पवार सरसावले; लोकांनाही केलं आवाहन

करोनामुळे राज्यातील आर्थिक परिस्थितीत बिकट झाली आहे. करोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननं अनेक क्षेत्रांना फटका बसला असून, हातावर पोट असलेल्यांसमोरही मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबईतील डबेवाल्यांनाही यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, आमदार रोहित पवार डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. रोहित पवार यांनी निधी उभारला असून, नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.

शहरातील चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम अव्याहतपणे करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही ठप्प आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहेत. लोकलगाड्या अजूनही सर्वसामान्य जनतेसाठी सुरू झाल्या नसल्याने व्यवसाय सुरू करण्यात अडचणी आहेत. त्यात अपुरे शिक्षण, इतर आर्थिक उत्पन्न नसल्याने डबेवाले प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत.

मुंबईतील डबेवाल्यांच्या अडचणी समजून घेत आमदार रोहित पवार यांनी मदत निधी उभा केला आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून, अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा,” असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील माहिती ट्विट केली आहे.

डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची उदाहरणे व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिली जातात. १८९० साली महाजी हावजी बच्चे यांनी पारशी माणसाला डबा पोहोचवण्याच्या निमित्ताने सुरू झालेली ही सेवा आजेपावेतो नित्यनेमाने सुरू होती. मुंबईचे पाच हजार डबेवाले दररोज सहा लाख चाकरमान्यांना डबा पोहोचवण्याचे काम करतात. विरार ते चर्चगेट, कल्याण ते सीएसएमटी आणि पनवेल अशा तिन्ही मार्गावर डबे पोहोचवणारे हे डबेवाले, मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवेवर बहुतांश अवलंबून आहेत. परंतु, लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांचा व्यवसाय अजूनही बंद आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/rohit-pawar-came-out-for-help-to-mumbai-dabbawala-bmh-90-2259410/