October 21st, 2020

रोहित पवारांनी केलं एकनाथ खडसेंचं स्वागत; म्हणाले, “…पण निसर्गाचाच नियम आहे”

भाजपावर साधला निशाणा

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दल चर्चा सुरू होत्या. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याची घोषणा केली. भाजपातून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादीतील नेत्यांकडून स्वागत केलं जात असून, रोहित पवारांनीही भाजपाला टोला लगावत खडसे यांचं स्वागत केलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांपासून वाढत गेलेल्या नाराजीनंतर एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाबद्दल माहिती दिली.

खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशाचा निर्णय निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह पक्षातील नेत्यांकडून खडसे यांचं स्वागत केलं जात आहे. प्रवेशाच्या या निर्णयावर रोहित पवार यांनीही ट्विट केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.
WelCome एकनाथ खडसे साहेब!,” असं ट्विट करत रोहित पवार यांनी एकनाथ खडसेंचं यांचं स्वागत केलं आहे.

“भाजपाची खऱ्या अर्थानं वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचं मला सांगितलं. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे,” असं सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची घोषणा केली होती.

https://www.loksatta.com/maharashtra-news/rohit-pawar-eknath-khadse-bjp-quit-ncp-join-bmh-90-2307663/