September 25th, 2020

रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमधील मुलांना दिले बर्थ डे गिफ्ट

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात राज्याचे लक्ष वेधणारे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत; त्याचीच पुनरावृत्ती या निमित्ताने झाली.

जामखेड : आमदार रोहित पवार यांचा कोणताही सामाजिक उपक्रम हटकेच असतो. विकासकामांतही त्यांचा हात कोणी धरणार नाही. आमदारकीला एक वर्ष उलटत नाही तोच त्यांनी कर्जत आणि जामखेड मतदारसंघात कामांचा रतीब घातला आहे.

कर्जतला एमआयडीसी मंजूर करून आणली तर जामखेडसाठी जळगावला पळवले गेलेले एसआरपीचे केंद्र मंजूर करून आणले. हळगावच्या कृषी महाविद्यालयास गती दिली. मिरजगावला ट्रामा सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

दोन्ही मतदारसंघात शेतीला उर्जितावस्थेत आणण्यासोबत कुकडी, सीनाच्या पाण्याचेही नियोजन केले. कालव्यांची कामे गतीने हलवली. बहुतांशी शाळा डिजीटल केल्या. कौशल्याधारीत शिक्षणाची सोय केली.

कर्जत -जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना एकूण 1 लाख १० हजार मास्क आणि 70 हजार आयुर्वेदिक वनस्पतींच्या रोपांची भेट दिली. दोन दिवसांनंतर त्यांचा वाढदिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याची तसेच पर्यावरणाची काळजी म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवला आहे.

कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि रोहित  पवार यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसानिमित्त  ‘कोरोना’  च्या पार्श्वभूमी अरोग्य संवर्धान आणि पर्यावरण समतोल ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन विविध सामाजिक हिताचे आदर्श ठरतील असे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत आणि जामखेड येथील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी त्यांनी आयुर्वेदिक वनस्पतींची भेट दिली. विविध वृक्षांमुळे जैवविविधता आणि निसर्ग यांचा समतोल राखण्यास मदत होते. हे ओळखूनच आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून राज्याचे लक्ष वेधणारा उपक्रम येथे राबविण्यात आला.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात राज्याचे लक्ष वेधणारे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत; त्याचीच पुनरावृत्ती या निमित्ताने झाली. एवढेच नाही तर राज्यातील इतर लोकप्रतिनिधीसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरला आहे, हे मात्र निश्चित!

विद्यार्थी दशेपासूनच वृक्षवेल्ली बद्दल प्रेम परोपकार आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावे तसेच हा पारंपारिक आणि नैसर्गिक वारसा आयुष्यभर जोपासला जावा, त्यासाठी हा प्रयत्न मार्गदर्शक ठरतो आहे.

विद्यार्थी जीवनापासूनच पर्यावरण रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. याचे भान सर्वांना यावे म्हणून रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच सध्या कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता आयुर्वेदिक वनस्पती या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबरोबरच वातावरण शुद्ध राखण्यास मदत करू शकतील असा विचार करून विद्यार्थ्यांना जास्वंद, पुदिना, हिरडा, काटेसावर, पारिजातक, गवती चहा, हिरडा ,कांचन, कढीपत्ता, गुलमोहर, आवळा, जांभूळ इत्यादी रोपे वाढदिवसाची भेट म्हणून दिली.

वाढदिवसाचा आनंद साजरा करताना देखील कोरोना विषाणू संक्रमणाची जाणीव ठेवून रोपांबरोबरच एकूण एक लाख दहा हजार मास्कदेखील विद्यार्थ्यांना वाटले. सोबतच कोरोनाविषाणू संक्रमण रोखण्यासाठी घ्यावयाची आवश्यक काळजी या संदर्भातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

संपादन – अशोक निंबाळकर

https://www.esakal.com/ahmednagar/rohit-pawar-gave-birthday-gifts-children-karjat-jamkhed-350753