October 1st, 2020

रोहित पवार यांच्याकडून भाजपला धक्का, कर्जत-जामखेडमधील 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेड मतदार संघातील भाजपच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासोबत भाजपच्या तीन नगरसेवकांनी माजी मंत्री राम शिंदे यांची साथ सोडत पक्षाला रामराम ठोकला आहे.
त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपाला जोरदार दणका दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

येथील विश्रामगृहावर कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सूर्यकांत मोरे, तालुका उपाध्यक्ष दयानंद कथले, आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्यामुळे भाजपला कर्जत पाठोपाठ जामखेड येथे गळती लागली आहे.

तेव्हा बोलताना नगरसेवक महेश निमोणकर यांनी म्हटलं की, मी अपक्ष निवडून येत भाजपला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला होता. वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले तरी सुद्धा भाजपवाले मला त्यांचा समजत नव्हते. तसेच शहराचा खुंटलेला विकास यामुळे प्रमुख कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करुन राष्ट्रवादीचे उदयोन्मुख नेतृत्व आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीनही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

तसेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर फिदा होत कर्जत नगरपंचायतीच्या विद्यमान दोन नगरसेवकांसह पाच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, आ. रोहित यांनी मतदारसंघांतील जनतेला विश्वासात घेत काम सुरु केले आहे. तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे बळ नक्कीच वाढेल. आ. रोहित पवार यांच्यावर या तीन नगसेवकांनी टाकलेल्या विश्वासाला पक्षात स्वागत करतो आणि लवकरच आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश करण्यात येईल.

https://policenama.com/rohit-pawar-jamkhed-municipal-corporation-corporators-joined-ncp-they-left-bjp-update/