August 3rd, 2020

म्हणून रोहित पवारांनी काढले राजेश टोपेंविषयी काढले हे उद्गार; नेतृत्व यालाच तर म्हणतात

अहमदनगर :

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नुकतेच मातृशोकाला सामोरे जावे लागले. याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी :-

‘जन्मदात्री आई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना आईची काळजी घेण्यासोबतच राज्याच्या आरोग्याची काळजी वाहणारा आणि कोरोनाच्या संकटाशी निकराने दोन हात करणारा आरोग्यमंत्री’ अशी नोंद महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांची झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मातोश्री शारदाताई या परवा त्यांना सोडून गेल्या. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. टोपे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांना अंत्यसंस्काराला जाता आलं नाही, याचं दुःख आहेच पण हे सगळे लोक आणि संपूर्ण महाराष्ट्र मनाने टोपे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहेत.

यानिमित्ताने गेल्या काही दिवसांत टोपे साहेबांबाबत प्रकर्षाने जाणवलेल्या काही गोष्टी मांडतो. कोरोना महामारीला सामोरं जाण्याबाबत एकूणच जगात गोंधळाची परिस्थिती असताना हा माणूस अत्यंत शांतपणे, तेवढ्याच धैर्याने आणि निडरपणे या संकटाशी लढत होता. कोरोनाची साथ थोपवण्यापासून, औषधे, वैद्यकीय उपकरणे, सुरक्षा साधने, मनुष्यबळ यांची उपलब्धता, क्वारंटाईन सेंटर, हॉस्पिटलच्या सुविधा निर्माण करणे अशी कितीतरी कामं तेवढ्याच तत्परतेने करत होता. त्यांची ही तत्परता पाहता महाविकास आघाडीतील सगळ्या नेत्यांनी त्यांच्या विभागाला ताकद दिली. तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करण्यापासून तर लोकशिक्षणासाठी माध्यमांना अभ्यासपूर्ण माहिती देण्यापर्यंत अनेक कामं एकाचवेळी त्यांनी केलेली आपण पाहिलीत.

कालही आईवर अंत्यसंस्कार करत असताना खचून न जाता धीरोदात्तपणे त्यांना उभं असल्याचं आपण पाहिलं. नेतृत्व यालाच तर म्हणतात. एवढंच नाही तर आपल्यावरील आभाळावरील दुःख बाजूला ठेवून त्यांनी लगेच कामालाही सुरुवात केली. परंपरेने दहा दिवसांचा दुखवटा पाळला जातो. पण तीनच दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय जाहीर करुन आपण खऱ्या अर्थाने कर्मयोगिंचा वारसा चालवत आहोत, हे त्यांनी दाखवून दिलंत. दुःखाला कवटाळून न बसता कर्माला महत्त्व द्या, असा चांगला संदेश देणारी एक वेगळी वाट आपण महाराष्ट्रासाठी निर्माण केलीत.

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हटलं जातं. ते खरंच आहे. पण इथं आईविना पोरकी झालेली व्यक्ती स्वतःच आई बनून महाराष्ट्राची सेवा करतेय, हेही तेवढंच खरंय. शारदाताईंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

https://www.krushirang.com/maharashtra/2020/08/03/17315/