August 1st, 2020

दूध दराचे श्रेय घेण्यासाठी भाजप आंदोलन करतंय- रोहित पवार

अहमदनगर |  दूध दराचे श्रेय घेण्यासाठी भाजप आंदोलन करतंय, अशी टीका करत दूध दरवाढीसंबंधात सरकारने याअगोदर देखील दोन तीन बैठका घेतल्या आहेत. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

भाजपने दूध दरवाढीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली आहे. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला टोला लगावला. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये 15 हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, असं ते म्हणाले.

दुसरीकडे इंधनाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पेट्रोल डिझेलचे भाव जाऊ लागले आहेत. मग त्याच्यावर का महाराष्ट्रातील भाजप नेते बोलत नाहीयेत, असा सवाल देखील त्यांनी विचारला.

शरद पवार यांच्यावर राम मंदिर वक्तव्यावरून विरोधकांकडून टीका केली  जात आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “राम मंदिर प्रकरणाचा निकाल लागला तेव्हाच साहेबांनी निकालाच स्वागत केलं होतं. आता राहिला प्रश्न भूमीपूजन सोहळ्याचा तर सध्याची कोवीड 19 परिस्थिती पाहता गर्दीच्या अनुषंगाने त्यांनी तसं वक्तव्य केलं आहे”