August 19th, 2020

Rohit Pawar: रोहित पवार म्हणतात…. अजित दादांची हिच स्टाइल भावते

Rohit Pawar सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून थेट शरद पवार यांच्या कुटुंबात वादळ उठलं असतानाच पवार कुटुंबातील एक प्रमुख सदस्य रोहित पवार यांनी अजित दादांचं कौतु केलं आहे.

मुंबईः पार्थ पवारांनी पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले होते. या प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. तर, पवार कुटुंबियांमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, बारामतीत पवार कुटुंबातील सगळ्या वादावर पडदा पडल्याचं बोललं जात आहे. तर, आज आमदार रोहित पवार यांनीही अजित पवारांचं कौतुक करत. या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दादांची थेट निर्णय घेण्याची स्टाइल मला भावते, असं, म्हणत अजित पवारांच्या कामाचं कौतुक त्यांनी केलं आहे.

रोहित पवार यांनी मतदारसंघातील काही कामानिमित्तानं आज अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील व इतर प्रश्नांबाबत अजित दादांना भेटलो. हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतीही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाइल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. असं ट्विट रोहित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीत घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य केलं होतं. हा विषय आमच्या कुटुंबातील असल्याचे नमूद करत अन्य कुणी यात पडण्याचे कारण नाही, असा संदेश देण्याचा रोहित यांनी प्रयत्न केला. पार्थ पवार हा विषय आमच्या घरातील आहे. त्यावर बोलण्यापेक्षा सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर बोला, असे रोहित म्हणाले.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rohit-pawar-praise-ajit-pawar-working-style/articleshow/77619022.cms