October 26th, 2020

देवेंद्र फडणवीसांबाबत असं बोलणं योग्य नाही; रोहित पवारांनी टोचले कान

“दुसरा मुद्दा मात्र खरा आहे”

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या करोनाचा संसर्ग झाल्यानं उपचार घेत आहेत. करोनाची लागण झाल्याची माहिती देत फडणवीस रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, एका नेटकऱ्यानं फडणवीस बिहारच्या निकालामुळे नाटक करत असल्याचं ट्विट केलं होतं. त्यावरून आमदार रोहित पवारांनी त्याचे कान टोचले.

गेल्या काही महिन्यांपासून दौऱ्यामध्ये व्यस्त असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी स्वतः ट्विट करत यांची माहिती दिली होती. मात्र, फडणवीस हे करोना झाल्याचं नाटक करत असल्याचं एकानं म्हटलं होतं.

त्यावरून आमदार रोहित पवार यांनी त्याला सुनावलं आहे. “देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत,” असं रोहित पवार म्हणाले.

काय होत ट्विट….

“करोना वगैरे काही नाही, बिहारमध्ये बीजेपी १००% हरणार आहे, हे त्यांना स्पष्ट दिसतंय आणि त्याचं खापर आपल्यावर फुटू नये म्हणून हे करोनाचं नाटक… बाकी काही नाही दादा, असं या नेटकऱ्यानं म्हटलं होतं.

https://www.loksatta.com/maharashtra-news/rohit-pawar-reply-his-supporter-about-fadnavis-coronavirus-infection-bmh-90-2311378/