October 16th, 2020

Rohit Pawar: पवारांच्या पुस्तकातील ‘ते’ पान; रोहित यांनी भाजपला दिले प्रत्युत्तर

Rohit Pawar आजोबांवर होणाऱ्या टीकेला नातवाने सडेतोड उत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या पुस्तकातील दाखला देत त्यांना भाजपकडून लक्ष्य करण्यात येत आहे. याचा आज आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला.

नगर: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. पवार यांच्या ‘ लोक माझे सांगाती ’ या पुस्तकातील एका पानावरील मजकूर व्हायरल करून त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होत आहे. याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सडेतोड भाषेत उत्तर दिले आहे. ‘एका पानाची झेराक्स मारून शेतकरी समजणार नाही. त्यासाठी संपूर्ण पुस्तक वाचावं लागेल किंबहुना राजकीय हिताच्या पलीकडं जाऊन चिखल-माती तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागेल,’ अशा शब्दात आमदार पवार यांनी सुनावलं आहे. (Rohit Pawar Slams BJP over Farm Bills )

भाजपचे मुंबईतील आमदार अतुल भातखळकर यांनी काही दिवसांपूर्वी पवार यांच्या या पुस्तकातील एका पानाचा फोटो ट्वीट करून वर्मावर बोट ठेवत टीका केली. या पानावर पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचे बंधन न ठेवता शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा असावी, असे मत व्यक्त केले आहे. अशीच तरतूद नव्या कृषी कायद्यात आहे. हा धागा पकडून भातखळकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समितीची एकाधिकारशाही मोडून काढण्याचा जोरदार पुरस्कार करणारे शरद पवार आज राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच्या परंपरेनुसार मोदी सरकारच्या एकाधिकारशाही मोडून शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या कृषी विधेयकांना विरोध करत आहेत.’ भातखळकर यांची ही पोस्ट आणि पवारांच्या पुस्तकाचे पान व्हायरल झाले आहे. त्यावरून पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. या टीकेला रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहून उत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे, ‘शेतकऱ्यांना निश्चितच बंधनमुक्त करावं, ही सर्वांचीच भूमिका आहे, करार शेतीही झालीच पाहिजे याबद्दलही कुणाचं दुमत नाही. परंतु सध्या केंद्र सरकारने जे कृषी कायदे मंजूर केले त्यात असलेल्या त्रुटींना शेतकऱ्यांचा विरोध आहे. बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल की नाही, याबद्दल कायद्यात एका शब्दाचाही उल्लेख नाही. शेतकऱ्यांना बंधनमुक्त करण्यासोबतच बाजार समित्यांचं अस्तित्वही टिकून राहिलं पाहिजे, पण केंद्र सरकारने मंजूर केलेले कायदे मात्र पद्धतशीरपणे बाजार समित्यांना संपुष्टात आणणारे आहेत. नव्या करार शेती कायद्यात शेतकऱ्यांना संरक्षण देण्याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही. मुळात शेती सुधारणा विधेयकामध्ये असलेल्या त्रुटी भाजपाला समजल्याच नाहीत. त्यासाठी त्यांना शेतकरी अगोदर समजून घ्यावा लागेल, तरच शेतकऱ्यांचं हित त्यांना समजेल. राजकारण करण्यासाठी ‘लोक माझे सांगाती’ च्या एका पानाची झेराक्स मारून शेतकरी समजणार नाही. त्यासाठी संपूर्ण पुस्तक वाचावं लागेल किंबहुना राजकीय हिताच्या पलीकडं जाऊन चिखल-माती तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागेल, त्याच्याशी बोलावं लागेल, त्याचं सुख-दुःख समजून घ्यावं लागेल, तरच शेतकरी आणि शेतकऱ्याचं हित तुम्हाला समजेल. एका पुस्तकाच्या एका पानातून फक्त राजकारण करता येईल आणि आता सध्या फक्त तेच होताना दिसतंय. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावून घेतला. तेव्हा मात्र राज्यातील विरोधकांनी तोंडात मिठाची गुळणी धरली आणि आज राजकारण करायला मात्र पोपटासारखं बोलत आहात. आपल्या शेतकरी मायबापाच्या प्रश्नावर तरी राजकारण करू नका! निवडणुकीच्या बैठकांसाठी दोन दिवसाआड तुम्ही दिल्लीच्या फेऱ्या मारता, मग कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेणं गरजेचं कसं आहे, हे तुम्हाला तुमच्या नेतृत्वाला पटवून सांगता येत नाही का? नॉन इश्यू चा इश्यू करुन लोकांची दिशाभूल करण्याची वृत्ती सोडून त्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करायला शिका, महाराष्ट्र धर्म निभावून बघा, जनता तुम्हालाही डोक्यावर घेईल,’ असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/rohit-pawars-scathing-reply-to-bjp-for-criticising-sharad-pawar/articleshow/78700461.cms