August 26th, 2020

प्रत्येक संकटाच्या वेळी साहेबांनी निर्णायक भूमिका पार पाडली आहे ; रोहित पवार आजोबांबाबत झाले भावुक

राज्यात किल्लारीचा भूकंप असो, गुजरातचा भूकंप असो किंवा मुंबईतील बॉम्बस्फोट असो… अशा प्रत्येक संकटाच्या वेळी शरद पवार साहेबांनी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. म्हणून तर केंद्रात सरकार कोणाचंही असो प्रत्येक संकटात त्या-त्या सरकारनेही साहेबांची मदत घेतली आहे. मार्गदर्शन घेतलं आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न असो की उद्योजकांचे.. कामगार, मजूर, महिला, व्यापारी, व्यावसायिक असे सर्वांचेच प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी नेहमी पुढाकार घेतला. किंबहुना या सर्वच घटकांना साहेबांचा नेहमी आधार वाटत आला आहे. म्हणून तर साहेबांच्या भोवती सतत लोकांची गर्दी पाहायला मिळते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही समोर सर्वार्थाने प्रबळ असलेल्या विरोधकांशी साहेबांनी एकाकी झुंज देऊन त्यांना सत्तेबाहेर घालवलं. हे साहेबांचं सामर्थ्य आहे आणि विरोधकही ते कबूल करताना दिसतात. आज देशात शक्तिशाली सरकार असूनही ठोस धोरण आखून लोकाभिमुख निर्णय घेतले जात नाहीत. प्रश्न सुटत नसल्याने लोकांचा आक्रोश कायम आहे, असं रोहित पवार म्हणाले.