August 15th, 2020

मागणी:मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, आमदार रोहित पवारांची मागणी

देशभरात कोरोनाचा वाढत आहे. या काळात अनेक धार्मिक स्थळांना टाळं लागलेलं आहे. राज्यातही सर्वच धार्मिक स्थळ ही खबरदारी म्हणून सध्या बंद आहेत. मात्र आता ही धार्मिक स्थळ खुली करण्यात यावीत अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आमदार रोहित पवारांनी केली आहे.

सध्या पवार कुटुंब हे राज्यातील राजकारणात चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नातू पार्थ पवारांनी सुशांत सिंह राजपूतप्रकरणी केलेले विधान आहे. याचा आजोबा शरद पवारांनी तिखट शब्दात समाचार घेतला आणि एकच वाद सुरू झाला. दरम्यान आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू करायला पाहिजे असं माझही मत असल्याचं ते म्हणाले. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. तसेच लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

याच काळात पर्युषण पर्व काळामध्ये मंदिरं खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचं म्हटलं होतं. आता असे असतानाच महाविकास आघाडीचे नेतेच जर मंदिर खुली करण्याची मागणी करत असतील तर यावर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/temples-and-religious-places-should-be-opened-to-the-public-demands-ncp-mla-rohit-pawar-127620339.html