आ. रोहित पवार आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी नगरमध्ये आले होते.
नगर : अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात भाजपची भूमिका म्हणजे लोकहिताचा विचार न करता केलेले राजकारण आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आता विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व राज्य सरकारने एकत्रितपणे टप्प्याटप्प्याने परीक्षा घ्याव्यात, अशी सूचना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आ. रोहित पवार आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी नगरमध्ये आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतिम परीक्षेसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत बोलताना आ. पवार म्हणाले की, राज्य सरकारने सर्व कुलगुरूंना विश्वासात घेऊन निर्णय घेतला होता. न्यायालयानेही यूजीसीने ३० सप्टेंबरपूर्वी परीक्षा घेण्याचे मत व्यक्त केले होते, ते मान्य केलेले नाही. आमचा हट्टही लोकहितासाठी होता. परंतु भाजपचा परीक्षेचा हट्ट केवळ राजकारणासाठी होता, अशी टीका त्यांनी केली.
मंदिरे उघडण्याच्या विषयावर भाजपचे उद्या, शनिवारपासून होणारे आंदोलन म्हणजे राजकारण आहे, हा विषय परिसराचे अर्थकारण, धार्मिक भावना यांचा असला तरी मंदिरांचे गाभारे लहान असतात, तेथे गर्दी झाल्यास आरोग्याची अडचण निर्माण होऊ शकते. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
भाजपला एवढा कळवळा येत असेल तर त्यांनी राज्याचा केंद्र सरकारकडे अडकलेल्या २६ हजार कोटी रुपयांचा, जीएसटीचा निधी मिळेवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा परंतु भाजप भीतीपोटी केंद्र सरकारविरुद्ध बोलू शकत नाही अशी टीकाही त्यांनी केली.
सुशांतसिंह प्रकरणातही भाजप राजकारण करत आहे. त्यांच्या राजकारणामुळेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई व महाराष्ट्र पोलिसांनी तपास योग्य केल्याचे म्हटले आहे, परंतु ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटलेले दिसत नाही. याचा अर्थ फडणवीस यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही आक्षेप आहे, असे मला वाटते, अशी टीका आ. पवार यांनी केली.