June 11th, 2020

रोहित पवारांमुळे सुटला १७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न

शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी आ.रोहित पवार हे गेली वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत.याबाबत त्यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले होते.

जामखेड : विमा संरक्षण योजनेतून वगळण्यात आलेल्या लिंबू पिकाला विमा संरक्षण मिळावे, मतदार संघातून होत असलेल्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार  रोहित पवारांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मतदारसंघातील लिंबु पिकाच्या विमा संरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत असताना तब्बल १ ७ जिल्ह्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता फळउत्पादक असलेल्या शेतकऱ्यांच्या लिंबू,संत्रा,मोसंबी,डाळींब,चिकू,पेरू आदी पिकांना विमा मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असताना येथील मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग शासनाच्या विविध योजनांपासुन वंचित आहे. या योजनांमध्ये असणाऱ्या काही तांत्रिक अडचणी दूर केल्यास शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळेल.यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्जही दाखल केले जातात.मात्र योजनांचे लक्षांक कमी असल्याने मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तसेच राज्यातील  शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही.

शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी आ.रोहित पवार हे गेली वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत.याबाबत त्यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले होते.

या निवेदनात हवामान आधारित फळपिक योजनेमधून सन २०१९-२० पासून लिंबू व पेरू हे पिक वगळले होते.मात्र त्याअगोदर जामखेड तालुक्यामध्ये २५०० हेक्टरवर केलेल्या लिंबू पिकासाठी शेतकऱ्यांना जवळपास ५.५० कोटी इतकी हवामान आधारित फळपिक विम्याची रक्कम मिळाली होती.मात्र सबंधित पिके विम्यातून वगळल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आमदार रोहित पवारांच्या या पाठपुराव्याने आता शासन निर्णय झाला असून या शासन निर्णयात प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१,२०२१-२२,२०२२-२३ या तीन वर्षांसाठी मृग बहारामध्ये संत्रा,मोसंबी,डाळींब,चिकू,पेरू व लिंबू या या सहा फळ पिकांसाठी व संत्रा,मोसंबी,काजू,डाळींब,आंबा,केळी,द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्टोबेरी या आठ पिकांकरी लागू करण्यात आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना सन २०२०-२१-२२ योजनेतून लिंबू या पिकासाठी अहमदनगर,बुलढाणा,जळगाव,परभणी,सोलापूर,पुणे,जालना धुळे वाशीम,नाशिक,उस्मानाबाद,अमरावती,नांदेड,लातूर अशा एकूण १४ जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
असे मिळणार लिंबू विमा संरक्षण: १)लिंबू पिकाच्या दि.१५ जून ते १५ जुलै या कमी पाऊस कालावधीमध्ये १०० मि.मि व त्यापेक्षा कमी कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.३५ हजार देय होईल तसेच या कालावधीत १०० मि.मि.पेक्षा १५० मि मि.पर्यंत झाल्यास नुकसान भरपाई रक्कम ३०,५०० देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु.३५००० २)

लिंबू पिकाच्या दि १६ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये १५ ते २५ दिवसांचा पावसात खंड  व त्या दिवसांचे जास्तीत जास्त तापमान कोणत्याही दिवशी २५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.१७,५०० देय राहील.

सदर कालावधीमध्ये सलग २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड तसेच दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३५ डिग्री सेल्सिअस किंवा जास्त राहिल्यास रु.३५,००० नुकसान भरपाई देय राहील.(२.५ मि मि.पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.कमाल नुकसान भरपाई रक्कम १७५०० रूपयांप्रमाणे एकूण विमा संरक्षित रक्कम ही प्रति हेक्टरी ७० हजार एवढी राहणार आहे.

आमदार रोहित पवारांनी मानले आभार
कृषी मंत्री दादाजी भुसे,कृषी विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच राज्य आणि केंद्र सरकारचा योग्य संवाद यामुळे हे शक्य झाले आहे  मी केवळ लोकांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा ठेवला असल्याची प्रतिक्रिया आ.पवार यांनी बोलताना दिली.

https://www.esakal.com/ahmednagar/problem-farmers-17-districts-was-solved-due-rohit-pawar-305738