June 6th, 2020

रोहित पवार म्हणाले, “युवकांनो, चिनी वस्तूंना पर्यायी उत्पादन सुरु करा’

भारत चीनी वस्तूंवर आयात कर धोरण बदलू शकते. याचा पुरेपुर लाभ युवकांनी घेतला पाहिजे. स्वतःची उत्पादने सुरु केली पाहिजे. येत्या दिवाळीत सजावटीपासून तर दिव्यांपर्यंतच्या खरेदीच चिनी वस्तूंची गरजच भासणार नाही.

नाशिक : ”जग बदलत आहे. त्याची दखल सर्वप्रथम युवकांनी घेतली पाहिजे. भारत चीनी वस्तूंवर आयात कर धोरण बदलू शकते. याचा पुरेपुर लाभ युवकांनी घेतला पाहिजे. स्वतःची उत्पादने सुरु केली पाहिजे. येत्या दिवाळीत सजावटीपासून तर दिव्यांपर्यंतच्या खरेदीच चिनी वस्तूंची गरजच भासणार नाही, अशी पर्यायी उत्पादने आपण तयार केली पाहिजेत. त्या दिशेने काम सुरु करा,” असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी केले.

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची बैठक  व्हिडिओ कॉंन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी विविध सूचना केल्या. यावेळी युवा उद्योजकांची नविन उपलब्ध झालेल्या उद्योगांवरील संधी यावर चर्चा झाली. या बैठकीत आमदार रोहित दादा पवार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ते म्हणाले की चायनीज वस्तूंवरील आयातकर वाढल्यामुळे स्वदेशी व स्थानिक उद्योजकांना चांगली संधी आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. यावर पदाधिकाऱ्यांनी भर दिला. चायनीज वस्तूवर वाढवण्यात आलेल्या आयात करामुळे युवा उद्योजकांना मोठ्या प्रमाणात इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रिकल, प्लॅस्टिक स्मॉल स्केल उद्योगांमध्ये संधी आहे. शासन स्तरावर होणाऱ्या मदतीचा लाभ घेऊन, या संधीचा फायदा कशाप्रकारे करता येईल यावर युवकांनी विचार करावा.

ते म्हणाले की दिवाळी हा भारतियांचा सण आहे. विविध सणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक लाइटिंग, डिस्को लाइटिंग अशा प्रकारचे वस्तू कमी भांडवलामध्ये उत्पादीत करणे शक्‍य आहे. याद्वारे आपण एका नवीन उद्योगाची सुरुवात करू शकतो. विविध उद्योग व्यवसाय सुरू करतांना महिला बचत गटांचा देखील मदतीचा हात घेऊन चायनीज वस्तूंवर मात करता येईल. त्याला पर्यायी वस्तूंची मागणी वाढविण्यात आयातकरामुळे नवउद्योजकांना सुवर्णसंधी आहे. सरकार स्तरावर मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसायवाढीसाठी नवउद्योजकांना सवलती देण्यात येतात. त्याचा फायदा घेऊन युवकांनी या संधीचा फायदा करून घ्यावा.

यावेळी श्‍याम हिरे, सागर खैरनार, अक्षय काहांडळ, किरण भुसारे, प्रफुल पवार, महेश शेळके, गणेश गायधनी, कैलास मोरे, सुनील गोटू आहेर, अध्यक्ष बबलू पाटील, राजेंद्र उफाडे, तोसिफ मनियार, अरुण आहेर, संदीप भेरे, सम्राट काकड, जयराम शिंदे, भूषण शिंदे, महेश कोरडे, सचिन पवार, जयेश हिरे, रवी बस्ते, कमलेश आहेर, संपतराव कड, विलास रौंदळ आदी सहभागी झाले होते.

https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/rohit-pawar-says-concentrate-alternative-chinese-product-55736