June 17th, 2020

कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय नाही – रोहित पवार

प्रत्येकापुढं वेगवेगळे प्रश्न आहेत, पण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. आज आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. याचं स्पष्ट कारण कळत नसलं तरी आपण अंदाज लावू शकतो. पण कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या (Sucide) हा पर्याय नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मांडलं आहे.

राज्यात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण कलाविश्वात खळबळ उडाली. याशिवाय राज्यात अनेक शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत. या समस्येवर रोहित पवार यांनी बोट ठेवलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न असतात. मात्र, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटला अनेकांनी कमेंन्टस दिल्या आहेत. यातील एका ट्विटर युजर्सने शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसल्याने ते आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी मागील आठवड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आपल्या फेसबुक पेजवरून आवाहन केलं होतं. योग्य काळजी घेऊन आपल्याला घराबाहेर पडावं लागेल. आपण असेच घरात बसून राहिलो, तर या संकटाची उंची एवढी वाढेल की, त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल. त्यामुळे आपल्या पालकांवर जबाबदारी टाकू नका, कोणतंही काम लहान-मोठं न समजता स्वीकारा, असं आवाहन रोहित पवारांनी केलं होतं.

https://marathi.latestly.com/maharashtra/suicide-is-not-an-option-on-any-issue-says-rohit-pawar-143052.html