आपला भारत हा समृद्ध व वैभवशाली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा असलेला देश आहे. कर्जत-जामखेडमध्येही अभिमानाने मान उंच व्हावी अशा अनेक परंपरा, ठिकाणे आहेत. खर्ड्या जवळचा शिवपट्टण किल्ला हा त्यापैकीच एक. याच किल्ल्याजवळ हिंदवी स्वराज्यातील शेवटची लढाई झाली होती आणि शत्रूला धूळ चारत आपल्या शूर मावळ्यांनी त्यावर भगवा फडकवला होता. आता या किल्ल्याच्या आवारात प्रेरणा, ऊर्जा देणारा भव्य स्वराज्य ध्वजस्तंभ साकार होत आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील विविध ७४ महत्त्वाच्या धार्मिक, आध्यात्मिक स्थळे, स्मारके, गडकिल्ले आदि ठिकाणी ध्वजाचे पूजन होणार आहे.
उद्देश:
हा स्वराज्य ध्वज सर्वांचा आहे. देशाचे भवितव्य असलेल्या युवा शक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार व प्रेरणा देईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळासोबत पुढे जाताना आपल्या समृद्ध परंपरा, वारसा जपण्याचा, वाढवण्याचा हा’एक प्रयत्न आहे. एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या स्वराज्य ध्वजाचे विविध संतपीठे, शौर्यपीठे, धार्मिक पीठाच्या ठिकाणी पूजन होणार आहे.
स्वराज्य ध्वजाचे महत्त्व:
स्वराज्य ध्वज हा भगव्या रंगातील आहे.“भगवा* म्हणजे उत्तम गुणांनी संपन्न.भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा आहे. धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व एकवटत असलेल्या या भगव्या ध्वजापुढे प्रत्येकजण कृतज्ञतेने नतमस्तक होतो. लाल व पिवळ्या रंगांच्या मिश्रणातून तयार झालेला भगवा रंग ऊर्जा, भक्ती-शक्ती व आनंदाचे प्रतिक मानला जातो. अग्नीच्या धडधडत्या ज्वालांमध्येही तो दिसतो. अग्नी वाईट गोष्टींचा विनाश करून शुद्धता देतो. भगव्या झेंड्याचा आकारही दुर्गुणांचा नाश करणाऱ्या अग्निज्वालांसारखाच आहे. भगवा रंग तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाचे प्रतिक आहे. भगवा प्रगतीचे, त्यागाचे, संघर्षाचे, न्यायाचे, प्रगल्भतेचे आणि समतेचे प्रतिक आहे.