June 4th, 2020

रोहित पवार यांना का वाटतोय मेहुणीचा अभिमान… तुम्ही म्हणाल ग्रेटच

रोहित पवार यांचा मतदारसंघ कर्जत-जामखेड असला तरी त्यांचा राज्याच्या राजकारणात वावर आहे. सातत्याने कोणत्याही मतदारसंघातील प्रश्नांवर ते भाष्य करीत असतात. ते उद्योजक असल्याने युवकांच्या रोजगार आणि शिक्षणावर त्यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे त्यांना फॉलो करणारी बरीच मंडळी आहे. सोशल मीडियात ते सक्रीय असतात.

नगर ः महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, धीरज देशमुख, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, राणे बंधू या मंडळींकडे सर्वाचे लक्ष लागलेले असते. त्यातील आणखी वलयांकीत नाव म्हणजे रोहित पवार. सध्या ते कर्जत-जामखेड या मतदारसंघाचे नेतृत्व करतात.

भाजपतील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत एंट्री केली. त्यांच्या निवडणुकीकडे सर्वच राज्याचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे म्हणून त्यांना राजकारणात वलय आहेच. परंतु त्यांनी स्वतःही अल्पावधीतच वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मतदारसंघ कर्जत-जामखेड असला तरी त्यांचा राज्याच्या राजकारणात वावर आहे. सातत्याने कोणत्याही मतदारसंघातील प्रश्नांवर ते भाष्य करीत असतात. ते उद्योजक असल्याने युवकांच्या रोजगार आणि शिक्षणावर त्यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे त्यांना फॉलो करणारी बरीच मंडळी आहे. सोशल मीडियात ते सक्रीय असतात.

ते प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण करत असतात, परंतु कौटुंबिक पातळीवरही रोहित हे तेवढेच संवेदनशील आहेत. अगदी विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेताना आई सुनंदा यांचा नामोल्लेख करून त्यांनी चुणूक दाखवली होती. कोरोना महामारीच्या काळात ते मतदारसंघात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. परगावहून आलेल्या लोकांना एकाच जागी क्वारंटाइन ठेवले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रादूर्भाव होणार नाही, ही त्यामागची त्यांची भूमिका आहे. यासाठी सर्व खर्च त्यांनी स्वतः केला आहे. कांदा-बटाटा, तसेच शिधा देऊन त्यांनी मतदारसंघातील लोकांची भूक भागवली आहे. राज्यभर सॅनिटायझर वाटप केले. तसेच जे डॉक्टर, नर्स, पोलिस कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. त्यांचा कोरोना योद्धा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांच्या कुटुंबातही एक कोरोना योद्धा आहे.

रोहित पवार यांच्या पत्नी कुंतीही समाजकारणात सक्रिय आहेत. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक सतीश मगर यांच्या त्या कन्या आहेत. आमदार रोहित यांची मेहुणी शिल्पा या डॉक्टर आहेत. त्यांनी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज (नर्हे, आंबेगाव), पुणे येथून २०१५ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. २०१७पासून काशीबाई नवले हॉस्पिटल निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळात घरी न बसता त्या रूग्णसेवा करीत आहेत.

रोहित पवार यांनी नुकतेच ससून हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाचाच कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला होता. या सर्वांसोबत डॉ. शिल्पा यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. ते म्हणतात, कोरोना महामारीच्या काळात सेवा देणारे सर्वच कोरोना योद्धे आहेत. त्यांचा अभिमान आहे. आमच्याही कुटुंबात एक कोरोना योद्धा आहे. ही अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली आहे.

https://www.esakal.com/ahmednagar/why-does-rohit-pawar-feel-proud-his-sister-law-302188